
पालघरच्या भरारी पथकाची समुद्रकिनारी धाड
मनोर, ता. ५ (बातमीदार) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पालघर भरारी पथकाने वसई तालुक्यात तीन ठिकाणी धाड टाकत २१ जणांना ताब्यात घेऊन ६४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे होळीपूर्वी मद्यपींना आवर घालण्यास सुरुवात केली आहे.
राजोडी बीचवरील कृष्णा बीच हॉटेलसमोरील समुद्रकिनारी सार्वजनिक मोकळ्या जागेत बसून २४ मद्यपी मद्य प्राशन करीत होते. त्यापैकी तेरा जण अवैधरित्या मद्यप्राशन करीत असताना आढळले. न्यायालयाने या तेरा मद्यपींना प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली, तर दुसऱ्या घटनेत राजोडी बीचवरील कृष्णा बीच रिसॉर्ट येथे पुन्हा धाडीत व्यवस्थापकाला पाच हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले. या प्रकरणी आठ आरोपींकडून प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला; तर समुद्रकिनारी सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या मद्य प्राशन करीत असलेल्या तेरा जणांना ताब्यात घेत एक हजार ७२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निरीक्षक प्रकाश काळे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.