
रंग मराठीचे
साहित्य, शिक्षण, चित्रपट, राजकारण आणि पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणारे प्रल्हाद केशव अत्रे यांना महाराष्ट्रातील एक झंझावती व्यक्तिमत्त्व मानले जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. घणाघाती वक्तृत्व आणि प्रभावी लेखनशैलीमुळे जनमानसात ते विशेष लोकप्रिय होते. याच काळात त्यांना ‘आचार्य’ ही बिरुदावली मिळाली.
पुण्यातील सासवडजवळ १३ ऑगस्ट १८९८ मध्ये जन्मलेल्या आचार्य अत्रे यांनी लंडनमधील विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. हाडाचे शिक्षक असलेल्या अत्रे यांनी शिक्षण क्षेत्रात नवनवे प्रयोग केले. मराठीतील प्रख्यात लेखक, कवी, नाटककार, शिक्षणतज्ज्ञ, ‘नवयुग’ साप्ताहिक आणि ‘मराठा’ वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांनी कीर्ती मिळवली. त्यांच्या ‘श्यामची आई’, ‘महात्मा फुले’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात ‘साष्टांग नमस्कार’, ‘लग्नाची बेडी’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘मोरूची मावशी’, ‘तो मी नव्हेच’ इत्यादी दर्जेदार नाटकांची निर्मिती केली. अत्रेंनी ‘केशवकुमार’ या नावाने विडंबनात्मक कविता लिहिल्या असून ‘झेंडूची फुले’ हा त्यांचा कवितासंग्रह विशेष गाजला. महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर दोन वेळा त्यांची निवड झाली. १९४२ मध्ये नाशिकमध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या अत्रे यांनी ३ जून १९६९ मध्ये जगाचा निरोप घेतला.
- पद्मजा जांगडे