रेवदंडा हेच विचार, ज्ञानाचे विद्यापीठ : मुख्यमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेवदंडा हेच विचार, ज्ञानाचे विद्यापीठ : मुख्यमंत्री
रेवदंडा हेच विचार, ज्ञानाचे विद्यापीठ : मुख्यमंत्री

रेवदंडा हेच विचार, ज्ञानाचे विद्यापीठ : मुख्यमंत्री

sakal_logo
By

तुर्भे (नवी मुंबई), ता. ५ (बातमीदार) : नानासाहेब आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विचारांची किंमत अनमोल आहे. त्यांचे विचार आणि ज्ञानामुळे माणूस घडवणारे खरे विद्यापीठ रेवदंडा येथे आहे. श्री बैठकांच्या माध्यमातून दूषित विचारांचा पगडा बाजूला सारून उत्तम ज्ञानाची शिकवण मनात रुजवली जाते. त्यामुळेच मनावरील ताण कमी होऊन सुखी जीवन जगण्यास मदत होत असल्याचे उद्‍गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत डॉ. सचिन धर्माधिकारी यांना राजस्थान येथील जगदीशप्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठाच्या वतीने रविवारी (ता. ५) ‘डी. लिट्.’ पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी बोलताना सचिन धर्माधिकारी यांना पदवी बहाल केल्यामुळे आज खऱ्या अर्थाने त्या पदवीचा सन्मान वाढल्याचेही मुख्यमंत्री आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले. नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या श्री बैठकांमुळे राज्यासह देशातील लाखो नागरिकांचे जीवन चांगल्या मार्गावर आले. वाईट विचारांचा नाश होऊन लोक चांगल्या मार्गावर वळले आणि त्यातीलच आपण एक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. जेव्हा आपल्याला मानसिक ताण येतो, तेव्हा मी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी संपर्क साधतो. त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर आपल्याला लगेच हायसे वाटते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नानासाहेब धर्माधिकारी यांनी सुरू केलेल्या कार्याचा वसा आप्पासाहेब आणि सचिन धर्माधिकारी चालवत आहेत. त्यामुळे सचिन धर्माधिकारी यांना ही पदवी बहाल करताना आपल्याला अतिशय आनंद होत असल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू कुलपती विनोद टिब्रेवाला म्हणाले. या वेळी व्यासपीठावर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री आप्पासाहेब तथा दत्तात्रेय धर्माधिकारी, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ. पूनम महाजन, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनोद टिब्रेवाला, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, माजी खासदार संजीव नाईक आदी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी मुंबई, ठाणे, रायगडसह नवी मुंबईतून दोन लाखांहून अधिक श्री सदस्य उपस्थित होते. सचिन धर्माधिकारी यांना डॉक्टरेट पदवी बहाल होताच उपस्थित लाखो श्री सदस्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

प्रथम देशाचा विचार आवश्‍यक
देशाने मला काय दिले, यापेक्षा मी देशाला काय देऊ शकतो, हे विचार आचरणात आणणे आवश्‍यक आहे. या विचारांमुळे देशाला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही. आप्पासाहेब धर्माधिकारी हे ज्ञानाचे विद्यापीठ आहे आणि डॉक्टरेट ही पदवी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या कार्यामुळे मिळाली. नानासाहेब, आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळेच हा पुरस्कार आपल्याला मिळाल्याचे सांगत हा गौरव खऱ्या अर्थाने श्री सदस्यांचा असल्याचे उद्‍गार सचिन धर्माधिकारी यांनी पदवीदान सोहळ्यावेळी काढले.

श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव
नानासाहेब धर्माधिकारी यांनी संत वाङ्मयाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाला सुरुवात केली. त्याचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले. आपल्या सर्वांचे कार्य जगासमोर आले, म्हणूनच त्याचा अनेक ठिकाणी गौरव होत आहे. त्यामुळे सचिन धर्माधिकारी यांना मिळालेला पुरस्कार हा श्री सदस्यांच्या कार्याचा गौरव करणारा असल्याचे उद्‍गार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले.

सुवर्णअक्षरांचा दिवस
आजचा दिवस सुवर्णअक्षरात लिहून ठेवावा असा आहे. जगात असा कोणताच दीक्षांत पदवीदान सोहळा झाला नाही, त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनसागर उपस्थित असल्याचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.