
शेअर ट्रेडिंग कंपनीला गंडा घालणाऱ्यास बेड्या
मुंबई, ता. ५ : मुंबईत एका शेअर ट्रेडिंग फर्ममध्ये कार्यरत ३१ वर्षीय अकाऊंटंटला ग्राहकाची २.७३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अटक केली आहे.
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मुंबईच्या एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणाचा तपास सुरू झाला. गुन्हे शाखेच्या पथकाने ४ मार्च शनिवारी कांदिवलीतून आरोपीला अटक केली. तक्रारदार व्यक्तीने शेअर-ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून डीमॅट खाते उघडले होते. खाते उघडताना आरोपीने तक्रारदाराला मदत केली होती. पीडित व्यक्तीने आरोपीशी २०१९ ते २०२१ या कालावधीत शेअर ट्रेडिंग खात्यातून कोणताही व्यवहार केला नाही; परंतु तक्रारदाराच्या खात्यातून सुमारे २.७३ कोटी रुपये वजा झाले. त्यानंतर याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आला. फरारी असलेल्या आरोपीला एका गुप्त माहितीच्या आधारे पकडण्यात आले. या गुन्ह्यात सहभागी असलेला आणखी एक आरोपी फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.