
ऐन हंगामात चिकूला कवडीचे मोल
बोर्डी, ता. १३ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चिकूचे उत्पादन घेतले जाते; मात्र यंदा चिकू पिकावर मोठे संकट आले असून भाव गडगडल्याने उत्पन्नावर विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याबाहेर निर्यातीसाठी वाहतूक मार्गाचा अडसर निर्माण झाल्याने स्थानिक बाजारपेठेत कमी दरात चिकूची विक्री करावी लागत आहे. यामुळे चिकू बागायतदार हवालदिल झाले असून, गुणकारी चिकू फळाला ऐनहंगामात कवडीचे मोल मिळत आहे.
डहाणू तालुका फलोत्पादनासाठी गेल्या १०० वर्षांपासून प्रसिद्ध असून चिकू पिकाला जागतिक मानांकन मिळाले आहे. परिसरातील शेतकरी आता प्रक्रिया उद्योगाकडे वळला असून अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. महाराष्ट्रातील नवी मुंबई, पुणे व नाशिक; तर गुजरात, अहमदाबाद, मध्य प्रदेशमध्ये इंदोर, उत्तर प्रदेशमध्ये कानपूर व दिल्ली शहरांतील बाजारपेठेमध्ये पालघर जिल्ह्यातील चिकू फळांना मोठी मागणी असते.
उत्पन्नाचा ‘मार्ग’च असुविधांच्या गर्तेत
रस्तामार्गे फळांची वाहतूक करून बाजारपेठेत पाठवणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिकिरीचे होत आहे. त्यामुळे बाहेरील राज्यातील बाजारपेठांमध्ये मागणी असूनही शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल कवडीमोल दरामध्ये स्थानिक बाजारपेठेत विकण्याची वेळ येऊन ठेपली आहे.
पावसाळी हंगामात उत्पादन घटल्यामुळे चिकू बागायतदारांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला होता. डिसेंबर २०२२ नंतर जानेवारी, फेब्रुवारी २०२३ या काळात चिकूचे उत्पादन समाधानकारक असले, तरी तुलनात्मक दृष्ट्या बाजारभाव बेताचेच राहिले. दरम्यान, मार्च महिना उजाडताच चिकू फळाचे बाजारभाव एकदम गडगडल्याने चिकू बागायतदार चिंतेच्या गर्तेत सापडला आहे.
----------------------------------------------------
बागायतीत हंगामी शेतीवर भर
भविष्यात जिल्ह्यातील चिकू पिकाला जगाच्या पाठीवर ओळख मिळण्याची आशा बागायतदारांकडून व्यक्त केली जात असली, तरी खताच्या वाढलेल्या किमती, वीज बिलात केलेली प्रचंड दरवाढ, मजुरांची टंचाई, दिवसेंदिवस पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास चिकू बागायतीच्या मुळावर आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी चिकू बागायतीमधील झाडे कापून हंगामी शेती करण्यावर भर दिला आहे. चालू वर्षी अस्थिर बाजारभावामुळे हंगामी पिकासाठी समाधानी नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
-------------------
रेल्वे सुविधेचाही खोडा...
२०२१-२२ दरम्यान पश्चिम रेल्वेने डहाणूतील शेतकऱ्यांना व चिकू बागायतदारांना माल उत्तर भारतातील शहराच्या बाजारपेठेमध्ये पाठवण्यासाठी रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. याचा चांगला समाधानकारक फायदा शेतकऱ्यांना झाला होता.
जुलै ते नोव्हेंबर २०२२ यादरम्यानच्या हंगामात फळांचे उत्पादन शून्य टक्क्यावर गेल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने ही सुविधा बंद केली. त्यामुळे चिकू फळाच्या निर्यातीला मोठ्या प्रमाणांत फटका बसला होता.
उत्तर भारतात फळे पाठवण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील, या दृष्टीने महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी व सचिव मिलिंद बाफना प्रयत्न करत आहेत.