
पुरुषाला लाजवेल अशी मुलुंडची महिला ओला चालक!
सदैव प्रवाशांच्या सेवेसी तप्तर!
सामाजिक भान जपणाऱ्या ‘ओला’चालक महिलेची अनोखी सेवा
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : वाहनचालकाच्या क्षेत्रात सहसा पुरुषांची मक्तेदारी पाहायला मिळते; मात्र पुरुषांच्या बरोबरीने आता महिलाही त्यात आपले स्थान बळकट करीत आहेत. महिलांनी चारचाकीचे स्टेअरिंग सांभाळणे सुरू केले आहे. लोकल चालवण्यापर्यंतही त्यांनी मजल मारली आहे. रिक्षा वा कॅब चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय आहे. मुंबईत सहा वर्षे ‘ओला’ चालवणाऱ्या विद्या शेळके यांचेही योगदान अनोखे ठरते. विशेष म्हणजे घरात दोन छोटी मुले असतानाही जीवाची पर्वा न करता त्यांनी लॉकडाऊन काळात मुंबईत अडकून पडलेल्या दिव्यांग, महिला आणि गरजूंना सेवा पुरवली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामधील उंदिरवाडीसारख्या छोट्याशा गावात विद्या यांचा जन्म झाला. कुटुंबियांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. काबाडकष्ट करून त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. २००९ मध्ये त्यांचा विवाह अनिल शेळके यांच्याशी झाला. सध्या शेळके दाम्पत्य १० वर्षांचा मुलगा आदी आणि ८ वर्षांची मुलगी आरोही यांच्यासोबत मुलुंडमध्ये वास्तव्याला आहे. विद्या यांच्या पतीचे स्वतःचे वाहन आहे. ते दररोज नाशिक ते मुंबई शेतमालाची वाहतूक करतात. महागाईच्या काळात घरखर्च आणि मुलांचे शैक्षणिक शुल्क पाहता फक्त पतीच्या मिळकतीवर संसाराचा गाडा चालवणे अवघड जात असल्याने विद्या यांनी स्वतः रिक्षा चालवून कुटुंबाला हातभार लावण्याचे ठरवले. २०१५ मध्ये त्या रिक्षा चालवायला लागल्या; मात्र पुरुषांची मक्तेदारी असल्यामुळे त्यांना अनेक अडचणी आल्या. त्यामुळे कर्ज घेऊन त्यांनी ओला टॅक्सी घेतली. २०१६ पासून आजपर्यंत त्या ओला टॅक्सी चालवत आहेत. विद्या यांचे काम खऱ्या अर्थाने लॉकडाऊनमध्ये समोर आले. एवढ्या मोठ्या संकटकाळात आपलेही काही सामाजिक योगदान असावे, अशा हेतूने विद्या कोविडदरम्यान ‘ओला’ची सेवा देत होत्या.
नागरिकांना सुखरूप घरी पोहचवले
विद्या शेळके यांनी ‘सकाळ’शी बोलताना लॉकडाऊन काळातील काही कटू अनुभव सांगितला. लॉकडाऊन काळात त्यांना नाशिकहून एका महिला प्रवाशाचा कॉल आला होता. त्या महिलेला मुंबईत महालक्ष्मीला जायचे होते. कारण तिच्या पतीने मद्याच्या नशेत तिला मारून मुलांसोबत घराबाहेर काढले होते. तिने नाशिक पोलिस ठाण्यात त्याबाबत तक्रारही दिली होती; मात्र लॉकडाऊन काळात दोन मुलांना घेऊन तिला माहेरी यायचे होते. अनेक अडचणी तिच्यासमोर होत्या. तिने सोशल मीडियावरून माझ्याशी संपर्क केला. मी तिला नाशिकहून सुखरूप माहेरी पोहचले, असे विद्या यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात मुंबईत अडकलेल्या अनेक दिव्यांग आणि वृद्ध कुटुंबियांना सुरक्षित घरी पोहचवल्याचेही त्या म्हणाल्या.
महिलांनी या क्षेत्रात यावे!
कोरोनाच्या संकटकाळात समाजाला माझ्या मदतची गरज आहे याची मला जाणीव झाली तेव्हा मी माझ्या मुलांना गावी आई-वडिलांकडे सोडले. त्यानंतर मुंबईत अडकून पडलेल्या नागरिकांना शहरातून घरी पोहचवण्याचे काम केले. लॉकडाऊन काळात अनेक अडचणी आल्या; परंतु माझ्या चांगल्या कार्याला पोलिस आणि नागरिकांकडून सहकार्य मिळाले. आज कोविड नियंत्रणात येऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही तेव्हा गरजूंना दिलेल्या सेवेचे फळ मिळत आहे. आजही अनेक प्रवासी मला फोन करून माझी गाडी बुक करतात तेव्हा मेहनतीचे चीज झाल्याचे समाधान मिळते. आज मुंबईत ‘ओला’सारख्या ॲपबेस्ड टॅक्सी सेवेत महिलांचे प्रमाण कमी आहे. टॅक्सीचे क्षेत्र आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही. महिलांनी त्यात यायला हवे, अशी भावना विद्या शेळके व्यक्त करतात.