
केडीएमसीमध्ये महिला सुरक्षित....
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : स्त्री आज अनेक क्षेत्रात प्रगती करत असली तरी समाजाचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन अद्यापही बदलल्याचे दिसत नाही. नोकरी व्यवसायात स्त्री म्हणून अनेक ठिकाणी आज तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. सरकारने स्त्रियांच्या सुरक्षेसाठी विशाखा समिती प्रत्येक कार्यालयात स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महिला कर्मचाऱ्यांना या विशाखा समितीमुळे सुरक्षिततेची भावना मनात निर्माण झाली असून त्या आणखी आत्मविश्वासाने कामाच्या ठिकाणी वावरु लागल्या आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विशाखा समितीकडे गेल्या सात-आठ वर्षात एकही तक्रार प्राप्त झालेली नाही. यावरुन केडीएमसीमध्ये महिला या सुरक्षित असल्याचे दिसून येते.
शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण पाहता बलात्कार, विनयभंग यांच्या शिकार महिला आजही होत असून या गुन्ह्यांची संख्या कमी झालेली नाही. कल्याण-डोंबिवली परिमंडळ क्षेत्रात वर्षभरात १०७ बलात्काराचे; तर १८० विनयभंगाचे गुन्हे नोंद झालेले आहेत. आजच्या घडीला घरातील प्रत्येक महिला ही करिअरच्या दृष्टीने किंवा घराला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडून नोकरी करु लागली आहे. नोकरीच्या ठिकाणी किंवा प्रवासातही महिलांना पुरुषांच्या वाकड्या नजरेचा सामना करावा लागतो. अनेकदा महिलांना पाहून वेगवेगळ्या कमेंट्स, जोक्स पास केले जातात; परंतु त्याला प्रतिउत्तर महिला देऊ शकत नाहीत. कार्यालयीन ठिकाणी स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन अद्यापही बदललेला दिसत नाही. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ होऊ नये म्हणून राज्य शासनाने २००९ साली शासन निर्णय पारित करुन शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालये शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी महिला तक्रार निवारण समिती, विशाखा समितीची रचना करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कार्यालयात या समितीच्या स्थापन झाल्या. या समितीविषयीची माहिती महिला कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात माहित नसल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येते. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातीलही अनेक महिला कर्मचाऱ्यांना विशाखा समिती म्हणजे काय? तिचे कार्य कसे चालते ? आपण नेमकी कोणत्या तक्रारी या समितीकडे करु शकतो याविषयी पुरेशी माहिती नसल्याचे दिसून आले.
---------------------
२०१६ ते २०२२ पर्यंत एकही तक्रार नाही
कल्याण-डोंबिवली पालिका कार्यालयात विशाखा समिती स्थापनेपासून केवळ ५ तक्रारी समितीकडे प्राप्त झाल्या होत्या. या पाच ही तक्रारींमध्ये पुढे काही तथ्य नसल्याचे आढळून आल्याचे पालिका अधिकारी सांगतात. २०१२ साली समितीकडे २ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. यातील एका तक्रारीत अर्ज करणाऱ्या महिलांनी आम्ही अर्ज केला नसल्याचे चौकशीत पुढे आल्याने ते प्रकरण तेथेच खारीज झाले होते. त्यासोबतच २०१३, २०१५ व २०१६ साली प्रत्येकी १ तक्रार समितीकडे प्राप्त झाली होती. त्यातही पुढे काही निष्पन्न झाले नसल्याचे दिसून आले होते. २०१६ पासून २०२२ पर्यंत विशाखा समितीकडे एकही तक्रार प्राप्त झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पाच वर्षात एकही तक्रार समितीकडे आली नसल्याने केडीएमसी कार्यालयातील महिला सुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.
-------------------------
पुरुषी दृष्टीकोन जैसे थे
समाजाचा दृष्टीकोन काही प्रमाणात बदलत असला तरी अनेक कार्यालयातील पुरुष कर्मचाऱ्यांचा दृष्टीकोन बदलल्याचे चित्र दिसून येत नाही. लैंगिक अत्याचाराचे प्रमाण कमी होत असले तरी मानसिक छळ अनेक ठिकाणी हा होत असतो. महिला कर्मचाऱ्यांविषयी बोलताना पातळी ओलांडणे, जोक्स पास करणे, दुहेरी भाषेत बोलणे असे प्रकार सुरू असल्याचे महिला कर्मचारी सांगतात. या बोलण्याविषयी आपण कोणाकडे तक्रारही करू शकत नाही. तक्रार करायची तरी स्त्रियांविषयी ही मंडळी बोलत आहे हे आपण सिद्ध कसे करणार? तसेच याविषयी शिक्षा काय आहेत याची फारशी माहिती नाही. त्यामुळे असे जोक्स आजही मान खाली घालून महिलांना एकूण घ्यावे लागत असल्याचे महिला कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. पुरुषांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत महिलांकडे केवळ स्त्री म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन बदलणार नाही असे ही अनेक महिलांनी सकाळ सोबत बोलताना सांगितले.