
‘आपला दवाखाना’ रुग्णांना वरदान
मुंबई, ता. ८ : पालिकेचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ उपक्रम मुंबईकर नागरिकांच्या पसंतीस उतरला असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या अवघ्या १२ दिवसांमध्ये एक लाखापेक्षा अधिक नागरिकांनी दवाखान्यातील सुविधांचा लाभ घेतला. आतापर्यंतच्या लाभार्थींची संख्या पाच लाखांच्या वर पोहोचली आहे.
‘आपला दवाखाना’ उपक्रमांतर्गत ३० नोव्हेंबर २०२२ रोजी एक लाख लाभार्थींची नोंद झाली. त्यानंतर महिनाभरात लाभार्थींची संख्या दोन लाखांपर्यंत गेली. २६ दिवसांनी ३ फेब्रुवारीला ३ लाखांच्या पार लाभार्थींची संख्या पोहोचली. २२ फेब्रुवारीला १९ दिवसांत चार लाख लाभार्थींचा टप्पा पार झाला. आता त्याहीपुढे जाऊन मागील अवघ्या १२ दिवसांत (२३ फेब्रुवारी ते ६ मार्च) एक लाख नवीन लाभार्थींची भर पडली आहे. ‘आपला दवाखाना’तील पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्रात १७ हजार ९५४ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ आदी उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.
आपला दवाखान्यांमधून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे व टॅब आधारित पद्धतीने सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा, वितरण आणि संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशील नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या दवाखान्यांचे कामकाज पेपरलेस पद्धतीने व पर्यावरणपूरक होत आहे, अशी माहिती देण्यात आली.
वाढता प्रतिसाद
एकूण ः ५,०१,१८८
मोफत तपासणी आणि औषधोपचार घेतलेले रुग्ण ः ४,८३,२३४
पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्रातील रुग्ण ः १७,९५४