
ठाण्यात उत्साहाच्या रंगांची उधळण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.७ : कुठे डिजे तर कुठे ढोल-ताशाचा निनाद... रेन डान्स, पाण्याचे फवारे आणि रंगांची उधळण... ठाण्यासह जिल्ह्यात दोन वर्षांनंतर धुळवडीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच यावेळी रंगांत रंगताना दिसले.
ठाणे शहरात सोमवारी सकाळपासूनच सोसाट्याचा वारा वाहत होता. धुळकण आणि मळभ दाटल्यामुळे हवामान बिघडले होते. कल्याण, डोंबिवलीसह इतर ठिकाणीही हेच हवामान अनुभवायला मिळाले. पण तरीही यंदा होलिकादहन आणि धुळवडीचा उत्साह पहायला मिळाला.
रात्री सात वाजल्यापासून ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत ठिकठिकाणी होलिका दहन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी होलिका दहन केल्यानंतर अचानक ठाणे गाठले. येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी होलिका दहन केल्यानंतर वागळे इस्टेट येथील माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी आयोजित केलेल्या होलिका दहन कार्यक्रमाला उपस्थिती लावली. बाळकूम येथे एक गाव एक होळी ही परंपरा यंदाही कायम होती. यावेळी गावकऱ्यांनी एकत्र येत होलिका दहन केले. ठाण्याच्या चेंदणी कोळीवाडा येथेही रात्री मोठ्या उत्साहात होलिका दहन करण्यात आले. यावेळी पावसाने गारांसह अवचित हजेरी लावल्याने उत्साहाला उधाण आले.
सोमवारी भक्तिभावाने होलिका दहन झाल्यानंतर मंगळवारी मोठ्या उत्साहात धुळवड साजरी करण्यात आली. त्यासाठी काही सोसायट्यांनी आयोजकांनी जंगी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. डिजे, वाद्यसंगीताच्या तालावर यावेळी रंगांची उधळण करत तरुणाई थिरकली. थंडाई, जिलेबी- फापडा, समोसे, वडापाव असा बेतही अनेक ठिकाणी होता.
यंदा निर्बंधमुक्त उत्सव
धुळवडीला कोणतेच निर्बंध नसल्याने पाण्याचा वापरही मोठ्या प्रमाणात झाला. अनेक सोसायट्यांनी पाण्याचे टँकर रेन डान्ससाठी मागवले होते. लहान मुले पिचकाऱ्या भरून धुळवडीचा आनंद घेत होते. महिलाही यावेळी मागे नव्हत्या. मनसोक्त रंगांची उधळण करत त्यांनी उद्या साजरा होणाऱ्या महिला दिनाच्या उत्साहाला सुरुवात केली. अनेक सामाजिक संस्थांनीही यावेळी हटके धुळवड साजरा करण्याचा प्रयत्न केला. विठाई प्रतिष्ठानच्या वतीने जिद्द शाळेतील विशेष मुलांसाबेत धुळवड साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी अनेक मराठी कलाकारही उपस्थित होते.
राजकीय शिमगाही रंगला
होलिका दहन आणि धुळवडीला ठाण्यात राजकीय शिमगाही रंगल्याचे दिसले. याची सुरुवात होलिकादहन होण्याच्या काही तासांपूर्वी ठाकरे- शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यापासून झाली. ठाण्यातील शिवाईनगरमधील जुनी शाखा ताब्यात घेण्यासाठी टाळे तोडण्याचा प्रकार शिंदे गटाने केला असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. गेल्या ३५ वर्षांपासून शिवाईनगर येथे शिवसेनेची शाखा कार्यरत आहे. मात्र या वादामुळे परिसरात एकच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करुन परिस्थिती हाताळली. तसेच कायदा आणि सुव्यस्था बिघडू नये, यासाठी या भागात जमावबंदीचे आदेश लागू केले होते. स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या ताब्यात शिवाईनगर येथील शाखा आहे. अनेक वर्षे येथून ते काम करतात. आता ठाकरे गटाचे कार्यकर्ते आडकाठी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी यावेळी केला.
दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाच्या नावे बोंब ठोकत होळी दहन केली. खोके कंपनीच्या बैलांना होय, अशी बोंब मारत होळीचे दहन यावेळी करण्यात आले. होळीसाठी जमलेल्या बायकांना सिलिंडर महागाईवरून प्रश्न विचारत सरकारवर निशाणा साधण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांसह ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही दिल्या.