
धुलवडीच्या रंगात रंगले मुंबईकर
मुंबईत धूलिवंदनाचा उत्साह
रंगपंचमीच्या रंगात रंगले मुंबईकर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ : होळी आणि रंगपंचमी सणाचा पूर्वीचाच धमाल उत्साह यंदा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, कोरोनाकाळानंतर जागरूक झालेल्या मुंबईकरांनी यंदा पर्यावरणपूरक होळी आणि नैसर्गिक धुळवड साजरी करण्याचा आनंद लुटला. पाण्याचा कमी वापर करत रंगपंचमी साजरी करण्यावर अनेकांचा भर होता. गुलालाची उधळण करीत बच्चेकंपनीनेही धमाल केली. क्षण उत्सवाचे... रंग उत्साहाचे, असेच वातावरण आज मुंबईभर होते.
मुलांसह सर्वच वयोगटातील नागरिक रंगांच्या दुनियेत न्हाऊन गेले होते. आपापल्या सोसायटीच्या आवारात, झोपडपट्टी परिसरात आणि टोलेजंग इमारतीच्या तळमजल्यावर सोमवारी पारंपरिक होळीपूजन करण्यात आले. भक्तिभावाने होलिकापूजन झाल्यानंतर मंगळवारी सकाळपासून धुळवडीचे रंग भरून आले होते. सोमवारी रात्री आलेल्या रिमझिम पावसामुळे आजचे सकाळचे वातावरण आल्हाददायक असल्याने उत्साहात भरच पडली. काही ठिकाणी डीजे आणि ढोल-ताशाचा निनादात रंगांची उधळण करण्यात आली. रेन डान्स आणि पाण्याचे फवारेही उडवले जात होते. नैसर्गिक रंगांबरोबरच फुलांनीही रंगपंचमी साजरी करण्यात आली.
वरळी कोळीवाड्यात परंपरेचे पालन
वरळी कोळीवाड्यात दर वर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने होळी आणि धुळवड साजरी झाली. मुंबईच्या सात बेटांवरील मूळ निवासी कोळी समाज आपले मुख्य सण होळी व नारळी पौर्णिमा जे निसर्गाशी जोडलेले आहेत ते आपल्या रुढी-परंपरा जपून उत्साहाने साजरे करतात. हेमंताचे म्हणजे थंडीचे दिवस संपून वसंताचे आगमन होताना स्वागतासाठी व नवीन वर्षामध्ये आपले दारिद्र्य, दोष आणि अवगुण प्रतीकात्मकरीत्या होळीमातेच्या चरणी अर्पून तिची विधिवत पूजा केली जाते. अग्नीत नारळ अर्पण केला जातो. वरळी कोळीवाड्यामध्ये प्रत्येक गल्लीत व विभागामध्ये किंवा घरासमोर छोटी होळी लावली जाते. आजही परंपरा कायम राखत कोळी बांधवांनी पारंपरिक कोळी गीते गाऊन टिपऱ्या वाजवत आणि नृत्य करत होळी साजरी केली, अशी माहिती नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय वरळीकर यांनी दिली.
आयना का बायना... घेतल्याशिवाय जायना!
पूर्वी रंगपंचमी साजरी झाल्यानंतर मित्र-मंडळी ‘आयना का बायना’ मागण्यासाठी रस्ते, सोसायटी आणि इमारतींमधून फिरायचे. मात्र, अशी संस्कृती आज काही ठराविक ठिकाणी पाहायला मिळते. गिरणगावातील चाळीत मोठी रंगपंचमी साजरी केली जाते. रंगपंचमीनंतर दुपारी चाळीतील प्रत्येक घरी विविध गाणी बोलून ‘आयना का बायना’ मागितला जातो. कोणी ५०; तर कोणी १०० रुपये आपापल्या सोयीनुसार देतात. मग जमा झालेल्या पैशांनी रंगपंचमी खेळणाऱ्या मुलांसाठी जेवणाचा बेत आखला जातो. गिरणगावात चाळ संस्कृती लोप पावून टॉवर उभे राहत आहेत; पण आजही असा प्रकार तिथे अनुभवायला मिळाला. इथल्या मुला-मुलींनी जमून ‘आयना का बायना’ करत संपूर्ण इमारत दणाणून टाकली. असाच अनुभव सांताक्रूझ पूर्व परिसरातील शांतता विकास इमारतीत आला. इथल्या तरुण मंडळींनी इमारतीतील प्रत्येक घरातील व्यक्तीला रंग लावून आपल्या उत्साहात सहभागी होण्याचा आग्रह केला. इमारतीचे सदस्य राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आयना का बायना’चा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
बच्चेकंपनीमध्ये ‘रंगीत युद्ध’
बच्चेकंपनीमध्ये रंगपंचमीचा सर्वात जास्त उत्साह पाहायला मिळाला. रंग लावणे, फुगे फोडणे आणि पिचकारीने पाणी उडवण्याचा आनंद त्यांच्यासाठी वेगळाच असतो. शिवडी परिसरात लहान मुलांनीच पाण्याचा एक हौद तयार केला होता. त्यातील रंगीत पाण्यात उडी मारून मित्रांना बळजबरीने ढकलून भिजवण्याची जणू चुरसच त्यांच्यात रंगली होती. सायन प्रतीक्षा नगरातील लहान मुलांनी सकाळपासून इमारतींमधील गच्चींचा ताबा घेतला होता. गच्चीत रंग भरलेल्या पाण्याच्या बादल्यांचा संपूर्ण साठा तयार ठेवण्यात आला होता. पिचकाऱ्यांत पाणी भरून दुसऱ्या इमारतीच्या मुलांना रंगवण्याची स्पर्धा पाहायला मिळाली. साहजिकच परिसराला ‘रंगीत युद्धा’चे स्वरूप आले होते. काही मुलांचा नेम चुकत असल्याने त्यांना रहिवाशांचा ओरडाही खावा लागत होता.