
मधुरा
मधुरा वेलणकर
सामाजिक जाणीव असलेली अभिनेत्री मधुरा वेलणकर एक उत्तम लेखिकाही आहे. मराठी चित्रपटसृष्टीत तिची एक स्वतंत्र ओळख आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त तिने स्त्रियांच्या कर्तृत्वाचा सन्मान करीत त्यांच्याशी साधलेला संवाद...
निसर्गाने केलेली उत्तम कलाकृती म्हणजे स्त्री!
माझे आई-बाबा माझ्यासाठी कायमच प्रेरणास्थानी राहिले आहेत. अनेक वर्षे दोघेही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. नेहमीच त्यांनी चांगले आणि मनाला आवडेल असे काम केले आहे. एक माणूस आणि एक कलाकार म्हणून दोन्ही दृष्टीने माझ्यासमोर त्यांचाच आदर्श आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी माझी आई खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी होती. तिच्याशिवाय मी काहीच करू शकले नसते. माझ्या आयुष्यातले सर्व निर्णय स्वतः घेण्याचे हक्क मला आहेत आणि नक्कीच त्यासाठी माझ्या पतीनेही मला तितकेच सहकार्य केले आहे. आयुष्यात आपल्याला जे करायचे आहे ते प्रत्येक महिलेने केलेच पाहिजे. स्त्रिया बाहेर कितीही काम करत असल्या, तरी घरात वेळ देता येत नाही म्हणून स्वतःला अपराधी समजतात; पण स्वतःच्या आयुष्यातले निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना आहेतच. निसर्गाने केलेली उत्तम कलाकृती म्हणजे स्त्री आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःला कुठेही कमी समजू नये. जर तुम्ही स्त्रियांना मान दिलात, तर तुम्हालाही इतरांकडून नक्कीच सन्मान मिळेल. आपल्या पिढीने पुढे जाताना स्त्री-पुरुष असा भेदभाव कमी करायला हवा आणि त्याची सुरुवात आम्ही आमच्या घरापासूनच केली आहे. त्यामुळे आमच्याकडे एक दिवस नाही; तर रोजच महिला दिन असतो... समस्त महिलांना शुभेच्छा!