मालमत्ता कराविरोधात मोर्चेबांधणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ता कराविरोधात मोर्चेबांधणी
मालमत्ता कराविरोधात मोर्चेबांधणी

मालमत्ता कराविरोधात मोर्चेबांधणी

sakal_logo
By

कामोठे, ता. ८ (बातमीदार) : पनवेल महापालिकेने नागरिकांवर लादलेल्या मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडी मोर्चा काढणार आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी सध्या जनजागृती केली जात आहे. याच अनुषंगाने कामोठे नोडमध्ये झालेल्या बैठकीला उदंड प्रतिसाद मिळाला असून मालमत्ता कराविरोधात जनमानसात रोष वाढला आहे.
नागरिकांचा विरोध डावलून पनवेल महापालिकेने मालमत्ता कर आकारणीचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता कराची नोटीस प्राप्त झाल्यावर कामोठे नोडमधील नागरिकांनी सर्वप्रथम महपालिकेविरोधात विराट मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता. यानंतर मालमत्ता कर रद्द करण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्तांना हजारो पोस्ट कार्ड पाठवणे, मालमत्ता कराची होळी करणे अशा प्रकारच्या आंदोलनांतूनही या निर्णयाविरोधातील संघर्ष सुरू ठेवला होता. मात्र, असे असतानादेखील नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने १३ मार्चला महाविकास आघाडीने महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. तसेच या आंदोलनात महापालिका हद्दीतील नागरिकांच्या मोठ्या प्रमाणातील सहभागासाठी जनजागृतीवर भर दिला आहे.
-------------------------------------
सर्वच राजकीय नेत्यांचा सहभाग
कामोठेतील मानसरोवर कॉम्प्लेक्स, प्रतीक जेम्स, वृंदावन सोसायटी, साई प्रेरणा सोसायटी येथे नुकतीच जनजागृतीपर बैठक घेण्यात आली होती. यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, काँग्रेस नेते आर. सी. घरत, शेकाप पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेस पनवेल महापालिका जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी नगरसेवक प्रमोद भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकुमार पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
------------------------------------------------
मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या ‘अ’वर्गाच्या महापालिकांपेक्षा ‘ड’ वर्गातील पनवेल महापालिकेचा मालमत्ता कर जास्त आहे. कोरोनामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. तत्कालीन सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या भावनेची जाणीव नाही.
- अमोल शितोळे, कामोठे शहर अध्यक्ष, शेकाप