
हुक्का पार्लर बंद केल्याने आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
भिवंडी, ता. ८ (बातमीदार) : भिवंडीतील हुक्का पार्लर बंद केल्याचा राग मनात धरून पोलिस ठाण्याच्या आवारात आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी घडली. राहुल मधुकर पाटील (४१) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव असून तो मानसरोवर येथे राहतो. त्याने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरून हुक्का पार्लर सुरू केले होते. ते हुक्का पार्लर शहर पोलिसांनी बंद केल्याने राहुल पाटील याने सोमवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना धमकावीत फिनॉईलची बाटली काढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे कृत्य करताना त्यास रोखले असता त्याने एएसआय सुरपाल बारेला व पोलिस उपनिरीक्षक शंकर शिंदे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी पोलिसांनी राहुल पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.