
पंचनाम्याच्या हालचालींना वेग
वसई, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने ऐन हंगामातच ‘शिमगा’ केला. अवेळी झालेल्या पावसामुळे विविध पिके घेणाऱ्या बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले. मोठ्या मेहनतीने उभी केलेली शेती-बागायती डोळ्यांदेखत भुईसपाट झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. याबाबतचे पंचनामे शासकीय स्तरावर नोंद करता यावेत म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी विभागाकडून तालुक्यातील अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात आल्या असून, प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्यानंतरच जिल्ह्यातील शेती-बागायतीमधील नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने जिल्ह्यात कहर केला असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावून घेतला गेला असून, शासकीय मदतीवरच शेती-बागायतदारांची मदार असणार आहे.
पालघर जिल्ह्यातील वसई, विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी, बोईसर व पालघर तालुक्याला अवेळी पाऊस, ढगाळ वातावरणाची झळ सोसावी लागली. अगोदरच चिकू व्यावसायिक बाजारभाव कमी मिळत असल्याने मेटाकुटीला आले असून, यंदा आंबा चांगले उत्पन्न मिळवून देईल, अशी आशा निर्माण झाली होती; परंतु अवकाळी पावसामुळे मोहोर गळून पडला असल्याने हापूस, पाचपायरीसह अन्य जातीच्या आंबा लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे मेहनत व पैसा दोन्हीही पाण्यात जाणार आहे. त्याचबरोबर फुलशेती व भाजीपाला शेतीवरदेखील परिणाम होणार आहे. नारळ, चिकू, पालक, फ्लॉवर, ढोबळी मिरची, काकडी, भेंडी, दुधी, मेथी, लाल माठ, वांगी, वालपापडी, घेवडा आदी पिकांना अवेळी पावसाचा मोठा फटका बसणार आहे. चाफा, जास्वंद, मोगरा, जाई, कागडा ही फुलशेती; आंबा, केळी ही पिकेही धोक्यात आली आहेत.
----------------------------------------------
शासकीय यंत्रणा कामाला
राज्यात अवेळी पावसामुळे किती नुकसान झाले याचे तातडीने पंचनामे करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यावर पालघर जिल्ह्यात शासकीय पातळीवर त्वरित दखल घेण्यात आली आहे. जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी तहसीलदारांना, तर जिल्हा कृषी विभाग अधिकारी दिलीप नेरकर यांनी तालुक्यातील संबंधित कृषी अधिकाऱ्यांना शेती, बागायतीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
-------------------------
कोट
अवेळी पावसामुळे पालघर जिल्ह्यातील शेतीखाली असलेल्या पिकांचे नुकसान किती प्रमाणात झाले आहे, याचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यात यावा, अशा सूचना प्रत्येक तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यावर नुकसानीचे प्रमाण समजेल.
- दिलीप नेरकर, जिल्हा कृषी विभाग अधिकारी, पालघर
----------------------
शेतमालाच्या विक्रीवरही परिणाम
अवकाळी पावसाने हवामानात बदल झाल्यामुळे लागवडीखालील असलेल्या पिकांवर कीड, बुरशी, त्याचबरोबर अन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटू शकते. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत विक्रीसाठी जाणाऱ्या शेतमालावर होणार आहे. कमी उत्पन्न व बाजारभाव या दोहोंचाही ताळमेळ गाठणे अशक्य होणार असल्यामुळे शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.