महिलांचा सन्मान

महिलांचा सन्मान

वसई, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी महिलांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहे अशा कर्तृत्ववान, अपार कष्टकरी महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत करण्यात आला. याकरिता विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पालघर जिल्ह्यात विकासाला दिशा देताना शैक्षणिक प्रगती तसेच लघु उद्योजक, व्यावसायिक क्षेत्रात महिला काम करत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विकासाला चालना मिळत आहे,
याचबरोबर समाजासोबत राजकीय क्षेत्रातदेखील भरारी घेत आहेत. गरजूंना मदत करण्यापासून ते अगदी गिर्यारोहण करणाऱ्या हिरकणीदेखील जिल्ह्यात आहेत.
वसई, नालासोपारा, विरार, विक्रमगड, बोईसर, पालघर, जव्हार, मोखाडा, डहाणूसह विविध भागांत महिला मेळावा, सत्कार, सन्मान उपक्रम सामाजिक संस्था, राजकीय मंडळींकडून करण्यात आले होते. यावेळी पोलिस, डॉक्टर, वकील, सफाई कामगार, शिक्षिका, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. गुलाब, भेटवस्तू, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. समाजात महिलांना येणाऱ्या अडचणी व त्यावर मात कशी करावी, महिलांनी व्यवसायात पुढे जाण्यासाठी कसे प्रयत्न करायला हवेत, यासह विविध क्षेत्रातील माहिती देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजनदेखील करण्यात आले होते.
पालघर जिल्ह्यात महिला दिनाचे औचित्य साधत आयोजित अनेक कार्यक्रमातून महिलांना त्यांच्या कार्यात यश मिळावे म्हणून शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी विविध ठिकाणी सकाळपासून कार्यक्रमाची रेलचेल पाहावयास मिळाली.
-------------------
पैठणीचा कार्यक्रम रंगला
जिल्ह्यातील काही भागात पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी महिलांनी आनंदाने सहभाग घेतला. यात बक्षीस म्हणून पैठणी देण्यात आली. यासह विविध खेळाचे आयोजनदेखील करण्यात आले होते.
------------------------------------
महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान
भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त मिरा-भाईंदर महापालिकेकडून घनकचरा विभागातील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळातसुद्धा आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्त मुख्य कार्यालयातील सर्व महिला अधिकाऱ्यांचादेखील या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महिला सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला उपस्थित महिला अधिकारी, महिला सफाई कर्मचारी यांना जागतिक दिनाच्या शुभेच्छा देऊन आयुक्त दिलीप ढोले यांनी मिरा-भाईंदर शहर स्वच्छ व हरित ठेवण्यासाठी महिला सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान हे महत्त्वाचे असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त मारुती गायकवाड, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त कल्पिता पिंपळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com