
ठाणेकरांचा प्रवास होणार गारेगार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे शहरातील नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी महापालिकेची ठाणे परिवहन सेवा कार्यरत आहे. ही सेवा अधिक सक्षम व्हावी व प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व सुखकर व्हावा यासाठी परिवहनच्या ताफ्यात वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांना या बससेवेचा फायदा घ्यावा व ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी असावी, यासाठी वातानुकूलित बससेवेचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन समिती तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. त्यामुळे परिवहन सेवा अधिक स्वस्त आणि सुविधाजनक झाली असून ठाणेकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. त्याचबरोबर परिवहन बसेसचा वापर वाढेल, असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी परिवहन सेवेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बस चालवण्यात येणार आहेत. यामध्ये आगामी काळात १२३ बस परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार असून, ४५ स्टॅण्डर्ड व १६ मिडी बस अशा ७१ वातानुकूलित बस तसेच १० स्टॅण्डर्ड बस व ४२ मिडी बस अशा ५२ सर्वसाधारण बस टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. वातानुकूलित २६ मिडी बस व शहरांतर्गत उर्वरित ४५ स्टॅण्डर्ड बस ठाणे शहराबाहेर दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर घाटकोपर, नवी मुंबई, पनवेल आदी मार्गावर चालवण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त बांगर यांनी सांगितले. तसेच सध्याच्या घडीला ठाणे परिवहन सेवेतर्फे व्होल्व्हो वातानुकूलित बस या बोरिवली मार्गावर सुरू आहे.
------------------------
दोन किलोमीटरमागे प्रवासभाड्यात कपात
सुरुवातीच्या प्रवासापासून दोन किलोमीटरपर्यंत परिवहनच्या व्होल्व्हो बसचे भाडे हे २० रुपये इतके आकारले जात होते. याच मार्गावर बेस्टचे भाडे सहा रुपये; तर एनएमएमटीचे भाडे १० रुपये इतके आकारले जात होते. ठाणे परिवहन सेवेच्या बसने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा या दृष्टीने भाड्याच्या दरात कपात करण्यात आली असून नवीन दोन किलोमीटरसाठी १० रुपये इतके तिकीट आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक दोन किलोमीटरमागे प्रवासभाड्यात कपात करून ४० किलोमीटरच्या प्रवासासाठी यापूर्वी १०५ रुपये मोजावे लागत होते, परंतु नवीन दरानुसार हेच भाडे ६५ रुपये इतके आकारले जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास कमी दरामध्ये सुखकर होण्यास मदत होणार आहे, असे आयुक्त बांगर यांनी सांगितले.
-------------------------------------
किलोमीटर पूर्वीचे दर (रुपयात) सुधारित दर (रुपयात)
०-२ २० १०
२-४ २५ १२
४-६ ३० १५
६-८ ३५ १८
८-१० ४० २०
१०-१४ ५० २५
१४-१६ ५५ २५
१६-२० ६५ ३०
२०-२२ ७५ ३५
२२-२४ ७५ ४०
२४-२६ ८० ४५
२६-३० ८५ ५०
३०-३४ ९५ ५५
३४-३६ १०० ६०
३६-३८ १०५ ६०
३८-४० १०५ ६५
--