
बेपत्ता मुलींचा सहा तासांत शोध
भाईंदर, ता. ८ (बातमीदार) : काशीमिरा भागातील मिरा गावातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा पोलिसांनी अवघ्या सहा तासांत शोध लावला आहे. या मुली ट्रेनने गोव्याला जात असताना पोलिसांनी सतर्कतेने तपास करून खेडमधून त्यांना ताब्यात घेतले व पालकांच्या स्वाधीन केले.
सहा मार्चला तीन अल्पवयीन मुली मिरा गावात असलेल्या उद्यानात दुपारी चारच्या सुमारास खेळण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळचे सात वाजल्यानंतरही त्या घरी परत न आल्याने पालकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. दुसऱ्या दिवशी काशीमिरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुली अल्पवयीन असल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम व सहायक निरीक्षक तुकाराम थाटकर यांच्या पथकाने मुलींकडे असलेल्या मोबाईलच्या लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण केले असता त्या गोव्याच्या दिशेने जात असून रत्नागिरी जिल्ह्यातील खेडजवळ त्यांचे लोकेशन असल्याचे दिसून आले. तातडीने खेड पोलिसांशी संपर्क करून मुलींना ताब्यात घेतले.