
जैविक कचऱ्याने जीवाशी खेळ
घणसोली, ता. ९ (बातमीदार)ः घणसोली खाडीकिनारी वारंवार जैविक कचरा टाकण्याचा प्रकार समोर येत आहे. या कचऱ्यामुळे मासेमारीसाठी खाडीकिनारी येणाऱ्या मच्छीमारांना दुखापतीचे प्रकार झाले आहेत. मात्र, तरीदेखील जैविक कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
नवी मुंबईतील घणसोली खाडीकिनाऱ्यावर अनेकदा जैविक कचरा आढळून आला आहे. यात रुग्णालयातील रुग्णांच्या विविध आजारांवरील उपचारासाठीच्या गोळ्या, औषधांच्या बाटल्या, तसेच मुदत संपलेल्या गोळ्यांची पाकिटे, इंजेक्शन्स आढळून आली आहेत. गेल्या काही वर्षांपासून घणसोली खाडीकिनाऱ्यावर इंजेक्शन आणि गोळ्यांचा साठा आढळून आला होता. यामुळे मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छीमारांना दुखापत झाल्याची नोंद आहे. अशातच आता पुन्हा एकदा घणसोली खाडीकिनाऱ्यावर जैविक कचऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात आढळल्याने मच्छीमारांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
------------------------------------------------------
सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी
खाडीकिनारी असलेल्या अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळेस हे प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर अद्यापही कठोर कारवाई होत नसल्याने मच्छीमार त्रस्त आहेत. कोळी बाणा चौक या ठिकाणाहून खाडी किनारी जाण्यासाठी रस्ता आहे, याठिकाणी जर सीसी टीव्ही कॅमेरे बसवण्यात आले तर खाडीकिनारी कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेची नजर ठेवणे सोपे होणार आहे.
-----------------------------------------------
घणसोली खाडीकिनारी असलेल्या जैविक आणि प्लास्टिक कचरा टाकणाऱ्या नागरिकांचा शोध घेत आहोत. यासाठीच्या आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना लवकरच केल्या जातील.
- संजय पाटील, घनकचरा विभाग, नवी मुंबई महापालिका