
उद्धव ठाकरे गटाच्या उपविभाग जिल्हा प्रमुखांवर गुन्हा दाखल
ठाणे, ता. १० (वार्ताहर) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्यावर वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात आक्षेपार्ह टीकाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभेचे समन्वयक एकनाथ भोईर, आयटी विभागप्रमुख शैलेश कदम आणि माजी परिवहन सदस्य दशरथ यादव यांनी ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्याविरोधात तक्रार केली होती. संजय घाडीगावकर यांनी आणि उद्धव ठाकरे गटाने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात टीकेची झोड उठविल्याने सदरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विरोधकांच्या या टीकेने महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या व नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असून संपूर्ण महाराष्ट्रभर असंतोषाचे वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप शिंदे गटातून केला जात आहे.