सहकार सेतू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहकार सेतू
सहकार सेतू

सहकार सेतू

sakal_logo
By

सहकार सेतू

शरद्चंद्र देसाई,
वकील, सहकार न्यायालय

नाहकरत प्रमाणपत्रासाठी शुल्‍क आकारणी योग्‍य?

प्रश्न ः माझे संस्‍थेमध्‍ये २५० चौ. फुटाचे वाणिज्‍य गाळे आहेत. ते मला विकायचे आहेत. मी त्‍यासाठी संस्‍थेकेडे नाहरकत प्रमाणपत्र मागितले आहे. ते देण्यासाठी संस्‍था माझ्याकडे ३० हजार रुपये मागत आहे. हे योग्‍य आहे का? तसेच याविषयी उपविधीमधील तरतुदी सांगाव्‍यात.
- उमेश ठाकूर, सहकार नगर, पुणे

उत्तर ः संस्‍था केवळ वाणिज्‍य वापरासाठी असलेल्‍या सभासदांसाठी जरी असली, तरी गाळा तबदिल करण्याची सर्वसाधारण पद्धत ही गृहनिर्माण संस्‍थेसारखीच असते. वाणिज्‍य वापरासाठीची संस्‍था ही जनरल संस्‍था या सदराखाली नोंदणीकृत होते.
मुख्‍य म्‍हणजे गाळा, सदनिका यांची विक्री करण्यासाठी सहकारी संस्‍थेच्‍या परवानी किंवा नाहरकत प्रमाणपत्राची आवश्‍यकता नाही, हे अनेक वेळा शासनातर्फे तसेच चर्चासत्रांमध्‍ये तज्ज्ञां‍मार्फत सांगितले जाते. तसेच नव्‍या पद्धतीच्‍या बातम्या वर्तमानपत्रांमध्‍ये ‍येत असतात. अशा सर्व बातम्‍या या सभासदांच्‍या हिताच्‍या दृष्‍टीने दिल्‍या जात असतात. सबब, आपण प्रमाणपत्र मागण्याची आवश्‍यकता नाही. संस्‍थेने आपल्‍याकडे नाहकरत प्रमाणपत्रासाठी ३० हजार रुपये देण्याची अट घालणे हे कायदेशीर अयोग्‍य आहे. अशी अट संस्‍थेला आपल्‍यावर घालता येत नाही.
आपण आपला गाळा नोंदणीकृत दस्‍ताने विक्री करावा व त्यानंतर उपविधीप्रमाणे गाळा तबदिल होण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करावी. सर्व कागदपत्रे म्‍हणजे गाळा तबदील करण्यासाठीचा अर्ज, सभासत्‍वाचा अर्ज, राजीनामा तसेच संस्‍थेत हमीपत्र इत्यादी देण्यात यावे. संस्‍था उपविधीप्रमाणे जास्‍तीत जास्‍त २,५०० रुपये हस्‍तांतर प्रीमियम तसेच हस्‍तांतर फी ५०० रुपये व प्रवेश फी १०० रुपये किंवा उपविधीमध्‍ये असलेल्‍या तरतुदीप्रमाणे घेणे हे कायदेशीर आहे. याविषयी अडचण किंवा आडकाठी इत्‍यादी झाल्‍यास आपण निबंधक कार्यालयाकडे तक्रार करू शकता.


प्रश्न ःआमची संस्‍था नव्‍याने नोंदणीकृत करण्यात आली आहे. त्‍यात मृख्‍य प्रवर्तक संस्‍था नोंदणीकृत केल्‍यानंतर जी पहिली सभा घेणे आवश्‍यक होते, ती घेण्यास टाळाटाळ करत आहेत. यासंबंधी माहिती द्यावी. संस्‍था मुंबईमध्‍ये आहे व त्‍यात निवासी, अनिवासी मिळून केवळ १४ भागधारक आहेत.
- अरविंद केवलरमाणी, मुंबई

उत्तर ः कोणत्‍याही संस्‍थेच्‍या नोंदणी प्रस्‍तावासाठी सभासद त्‍यांना प्रवर्तक असे संबोधतात. ते सर्वसंमतीने मुख्‍य प्रवर्तक नेमतात किंवा निवडतात. मुख्‍य प्रवर्तक हा महत्त्‍वाचा दुआ असतो. या मुख्‍य प्रवर्तकाने प्रवर्तक व नोंदणी अधिकारी यांच्‍यामध्‍ये दुआ होऊन किंवा व्‍यवस्थित संधान बांधून संस्‍था नोंदणीचा प्रस्‍ताव सादर करणे, त्‍यामध्‍ये असलेल्‍या अडचणी, कागदपत्रे इत्‍यादींची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. किंबहुना हे काम करण्यासाठीच मुख्‍य प्रवर्तक यांची नेमणूक केली जाते.
मुख् ‍यप्रवर्तकाने नोंदणी प्रस्‍ताव सादर करणे, सर्व प्रवर्तकांची माहिती संकलित करून नोंदणी अधिकारी यांना देणे व नोंदणी प्रस्‍तावावर काही कार्यालयीन आक्षेप असल्‍यास त्‍याचे संपूर्णपणे निराकरण करणे हे काम मुख्‍य प्रवर्तकाचे आहे. मुख्‍य प्रवर्तक याने प्रवर्तकांचे नोंदणी प्रस्‍तावासंबंधांमधील गोळा केलेले पैसे यांचे नियोजित बँकांमध्‍ये भरणा करून तसे प्रमाणपत्र सादर करणे आवश्‍यक आहे.
या सर्व बाबी पूर्ण झाल्‍यानंतर नोंदणी अधिकारी संस्‍था नोंदणी करून तसे प्रमाणपत्र, ज्ञापन व इतर कागदपत्रे देतात. संस्‍थेचे मंजूर उपविधी व जो नोंदणी प्रस्‍ताव नोंदण्यात आला आहे, त्‍याची संपूर्ण सत्‍यप्रत मुख्‍य प्रवर्तकाला देतो. जेणेकरून तो संस्‍थेचा प्रथम व मुख्‍य दस्‍तावेज होतो. तो संस्‍थेच्‍या नोंदणीचा गाभा आहे. मुख्‍य प्रवर्तक हे कार्यालयीन कामकाजासाठी आवश्‍यक असे पद आहे.
संस्‍था नोंदणी झाल्‍यानंतर तीन महिन्यांच्‍या आत मुख्‍य प्रवर्तक तसेच नोंदणी अधिकारी यांनी त्‍या कार्यालयामार्फत नियुक्‍त केलेल्‍या प्रशासकीय अधिकाऱ्याच्‍या उपस्थितीत संस्‍थेची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे आवश्‍यक आहे. या सभेची विषयपत्रिका, नोटीस, ही मंजूर उपविधीनुसार असणे आवश्‍यक आहे. विषयपत्रिकेवरील सर्व विषय त्‍याच पद्धतीने व क्रमाने करणे आवश्‍यक आहे. या पहिल्‍या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्‍ये नवीन समितीची निवडणूक घेऊन ती कार्यरत केली जाते व या समिती सभेमध्‍ये मुख्‍य प्रवर्तकाचा कार्यकाळ संपतो. मुख्‍य प्रवर्तक जर प्रथम सर्वसाधारण सभा घेण्यास टाळाटाळ करत असेल तर सर्व प्रवर्तकांनी तसा प्रस्‍ताव तयार करून नोंदणी अधिकारी यांना सादर करावा व त्‍यांच्‍यामार्फत मुख्‍य प्रवर्तक याची नियुक्‍ती रद्द करून नवीन मुख्‍य प्रवर्तक इतर प्रवर्तकांमधून नेमणूक करून संस्‍थेची प्रथम सर्वसाधारण सभा घेण्यात यावी. संस्‍थेची प्रथम सर्वसाधारण सभा घेणे हे अत्‍यावश्‍यक व कायदेशीर काम आहे व त्‍याचमुळे संस्‍थेची पुढील वाटचाल कायद्याप्रमाणे चालणे सुरू होते.

सहकारी संस्था, सहकार कायदा याबाबतचे आपले प्रश्न पुढील ई-मेलवर पाठवावेत ः sharadchandra.desai@yahoo.in