
मुंबईवरील आघाताचे ‘शेखाडी’तील साक्षीदार
मुंबईवरील आघाताचे ‘शेखाडी’तील साक्षीदार
----------------------------------
ेंमहेंद्र दुसार, अलिबाग
रायगड जिल्ह्यातील शेखाडी बंदरात उतरवण्यात आलेल्या स्फोटकांनंतरच आजच्या दिवशी मुंबई बॉम्बस्फोटाच्या मालिकेने हादरली होती. या दिवसाची आठवण येताच आजही अंगावर काटा उभा राहतो. हा भूतकाळ विसरता येणार नाही, कारण त्याची भीषणता तशी होती. या घटनेनंतर खऱ्या अर्थाने दुर्गम भागात असलेल्या शेखाडी गावाचे नाव जगाच्या पटलावर अधोरेखित झाले होते. या घटनेला आज तीस वर्षे पूर्ण होत असताना त्यावेळच्या सागरी सुरक्षेची स्थिती आणि आताच्या परिस्थितीत कमालीचा बदल झाला आहे. कारण त्यावेळेला संशयाच्या नजरेतून ज्यांना पाहिले जात होते तेच आता दक्ष नागरिक म्हणून किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी सागर प्रहरीच्या भूमिकेत किनारपट्टीवर तैनात आहेत. त्याच शेखाडीची आजची वस्तुस्थिती मांडणारा हा रिपोर्ताज....
-------------------------------------------------
श्रीवर्धन, मुरूड तालुक्यांत अशी अनेक नैसर्गिक बंदरे आहेत, ज्या बंदरांचा वापर तस्करीसाठी केला जात असे. मुंबईतील दाऊदसारख्या कुख्यात तस्करांना ही बंदरे आवडती ठिकाणे होती. शक्यतो रात्रीच्या वेळेला तस्करीचा माल घेऊन बोटी बंदराला लागायच्या, सकाळ होईपर्यंत मालाच्या पेट्या गुप्त अड्ड्यांवर पोहचत होत्या. आज जसा समुद्र किनाऱ्यावर पर्यटनामुळे विजेचा झगमगाट दिसतो, तसा तीस वर्षांपूर्वी अजिबात नव्हता. काळोख पडताच सर्व चिडीचूप होत असे. सागरी सुरक्षा दलाचे श्रीवर्धन तालुका अध्यक्ष हिदायत अली खान सांगतात, मुंबईत बॉम्बस्फोट होण्यापूर्वी तीन दिवस रात्रभर माल उतरवण्याचे काम शेखाडी बंदरात सुरू होते. तेव्हा सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची तस्करी सर्रास चालायची. एका रात्रीला ३०० रुपये मिळतात म्हणून आजूबाजूचे तरुणही मजुरकर म्हणून सहज उपलब्ध होत; मात्र, त्या रात्री बंदरात आलेल्या होड्यांमधून काय उतरवले जात आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. रात्रभर गाड्या या घाटातून जात होत्या. मुंबईत जेव्हा स्फोट झाल्यावर त्याचे कनेक्शन शेखाडीशी आहे, हे समजल्यावर किती मोठी चूक केली हे समजून आल्याचे ते सांगतात, पण पर्याय नव्हता. अनेकांची धरपकड झाली, त्यात हिदायत यांचीही झाली. दोन-अडीच वर्षे चौकशीसाठी तुरुंगांत राहिल्यावर त्यांची निर्दोष सुटका झाली. हिदायत हे तेव्हा विशीतील तरुण होते; मात्र, त्या घटनेपासून त्यांनी मुलाबाळांसह भूमीसाठी जगण्याचा निर्धार केला आहे. सध्या शेखाडी किनाऱ्यावर नारळपाणी विकून ते आपल्या कुटुंबाचे पालपोषण करतात. त्यांच्यासारखे अनेक जण या परिसरात आहेत, जे सागरी सुरक्षेच्या उपक्रमांमध्ये सातत्याने भाग घेतात. किनारपट्टीवर कोणतीही संशयास्पद बोट, व्यक्तींची हालचाल झालेली दिसल्यास तत्काळ हजर होतात. त्या घटनेची शहानिशा करतात, कोस्टगार्ड, पोलिसांच्या गस्तीबरोबर हे तरुण रात्रभर बरोबर असतात. तपास यंत्रणेला शक्य तितके सहकार्य करण्यासाठी शेखाडीतील तरुण पुढाकार घेतात. यामुळेच येथील तस्करी शंभर टक्के बंद झालेली आहे. समुद्रातून काही वाहून आलेले असेल, त्याबद्दलही सतर्कता बाळगली जाते. जसे सीमेवर सैनिक पहारा देत असतात, त्याप्रमाणे या गावातील तरुण किनाऱ्यावर काम करतात.
---------------------------------------------------
काळानुरूप शेखाडीला नवे रूप
३० वर्षांपूर्वी ज्या मार्गाने स्फोटके नेण्यात आली, त्या मार्गाने प्रवास केल्यावर तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय आहे हे अधिक समजते. शेखाडी ते बोर्लीपंचतन, म्हसळा आणि तेथून मोर्बा मार्गे माणगाव येथे मुंबई-गोवा महामार्गाला जाऊन मिळतो. सध्याच्या स्थितीतही हा प्रवास खूपच कठीण असला तरी जंगल आणि चढ-उताराच्या या मार्गावर बऱ्यापैकी घरे झाली आहेत. अनेक हॉटेल्स आहेत. परिसरातील रस्ते चांगले सिमेंट काँक्रिटचे प्रशस्त, दिवाबत्ती झाली असल्याने वाहनांची रहदारी पूर्वीपेक्षा कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे फारशी भीती वाटत नाही.
---------------------------------
‘फ्लाईंग बर्ड श्रीवर्धन’तैनात
जिल्हा सागरी सुरक्षा कक्षाचे पोलिस निरीक्षक नितीन गवारे सांगतात, किनारपट्टीवरील तरुण सागरी सुरक्षा दलात काम करण्यास स्वतःहून तयार होतात. सध्या रायगड जिल्ह्यात दोन हजार ५८७ सागर सुरक्षा सदस्य आहेत; तर २०७ दल कार्यरत आहेत. सध्या ‘फ्लाईंग बर्ड श्रीवर्धन’ या नावाने एक रेस्कू- डिझास्टर ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून खूप महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळत असते. कमी खर्चात आणि अधिक प्रभावीपणे काम करणारी ही यंत्रणा असल्याने सागरी सुरक्षेच्या बाबतीत हे सदस्य अविभाज्य भाग बनत आहेत. याचबरोबर खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांकडूनही खूप महत्त्वाची कामगिरी बजावली जाते. या मच्छीमारांकडून खोल समुद्रात काय चालले आहे याची माहिती तत्काळ सुरक्षा यंत्रणेला मिळते. कोस्टगार्ड, नेव्ही, सागरी पोलिस यांच्या पाठीशी पाठ लावून सागर सुरक्षा दलाचे सदस्य काम करीत आहेत.
-----------------------------------------
गरिबीमुळे पिचलेल्या येथील लोकांचा दुष्मनांनी गैरफायदा घेतला. अशी घटना घडू नये, यासाठी येथील तरुण सातत्याने पुढाकार घेतात. हा देश आपला आहे आणि त्यासाठी काही तरी चांगले करण्याची जाणीव येथील तरुणांमध्ये रुजली आहे.
- दानिश फणसेकर, सदस्य, शेखाडी ग्रामपंचायत
--------------------------------------
१२ सीरियल बॉम्बस्फोटांनंतर शेखाडी आणि आजूबाजूच्या गावांतील तरुणांचीही धरपकड करण्यात आली. नाक्यानाक्यावर हातात रायफली घेतलेल्या पोलिसांचा पहारा होता. अतिसंवेदनशील ठिकाणी आर्मीचे जवान रायफली ताणून असायचे. मात्र, तीस वर्षांपूर्वींची परिस्थिती आज नक्कीच बदललेली आहे.
- सुभाष म्हात्रे, बॉम्बस्फोट वृत्तांकन करणारे ‘सकाळ’चे बातमीदार