
रवींद्र वायकरांविरोधात सोमय्यांची तक्रार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचे निकटवर्ती आमदार रवींद्र वायकर यांच्याविरोधात आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. वायकर यांनी नवीन जमीन घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरील दोन लाख चौरस फुटांचे मुंबई पालिकेच्या मालकीचे लहान मुलांचे मैदान वायकरांनी गिळंकृत केल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीतून केला आहे. अविनाश भोसले, शहीद बलवा कंपनीने वायकरांसोबत २००९ मध्ये लिंक रोड येथील कमाल अमरोली स्टुडिओच्या जागेतील प्लॉट विकत घेतला. या प्लॉटमधील ३३ टक्के जागेवर स्पोर्टस ट्रेनिंग सेंटर बनवायच्या नावाखाली भव्य फाईव्ह स्टार क्लब बनवून वायकरांनी ते पैसे बँकेकडून वसूल केले आणि दोन तृतीयांश जागा ही खुल्या मैदानासाठी पालिकेच्या ताब्यात देण्याची कागदी प्रक्रिया केल्याचा आरोप सोमय्या यांनी तक्रारीत केला आहे.