
कोपर, डोंबिवलीत शौचालयची अनुपलब्धता
शर्मिला वाळुंज ः डोंबिवली
कोपर ते कल्याण रेल्वे स्थानकातील शौचालयांचा विचार केला तर ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशीच परिस्थिती पाहावयास मिळते. महिलांची यामध्ये सर्वांत जास्त कुचंबणा होते. शौचालयाच्या ठिकाणी असुरक्षितता, पैसे देऊनही सोयी-सुविधा नाहीत अशी अवस्था आहे. कोपर आणि डोंबिवलीतील महिलांना तर शौचालयाची सुविधा नाही. हे चित्र पाहता रेल्वे प्रशासन महिलांच्या समस्यांकडे गांभीर्याने कधी पाहणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
---------------------------------------------------
पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित...
नोकरीनिमित्त आज हजारो महिला रेल्वेने प्रवास करत आहेत. महिला प्रवाशांची संख्या वाढूनही महिलांसाठी आवश्यक अशा रेल्वे स्थानकातील सोयी-सुविधांचा अभाव अजूनही कायम दिसतो. महिला रेल्वे प्रवासी पायाभूत सोयी-सुविधांपासून वंचित असल्याचे चित्र कोपर ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान दिसून येते.
मुंबईला कामानिमित्त येणाऱ्या व ठाणेपल्याड राहणाऱ्या चाकरमान्यांचा लोकल प्रवास हा दोन तासांचा आहे. लांबचा प्रवास असल्याने येथील स्थानकांत पायाभूत सुविधा असणे हा प्रवाशांचा मूलभूत अधिकार आहे; मात्र त्या अधिकारापासून प्रवासी वंचित असल्याचे दिसते.
रेल्वे स्थानकात पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा प्रवाशांसाठी नाही. शौचालयांची स्थिती पाहिली तर तेथे जाणेच कोणी पसंत करत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे महिला प्रवाशांसह रुग्णांचेही अनेक वेळा हाल होतात.
महिलांच्या शौचालयांची दुरवस्था, बाजूलाच असलेल्या पुरुषांच्या शौचालयातील पुरुषांची वर्दळ जास्त, शौचालयाच्या ठिकाणी महिला कर्मचारी नसणे, असुरक्षितता अशा कारणांमुळे आज असंख्य महिला या शौचालयांचा वापर कमी प्रमाणात करत असल्याचे दिसून आले आहे.
-------------------------------------------------------------
कोपर रेल्वे स्थानकात शौचालयाची वानवा
दिवा-वसई रेल्वे मार्ग मध्य रेल्वे मार्गाला कोपर स्थानकामुळे जोडला गेला आहे. त्यामुळे या स्थानकांवर प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. या स्थानकात शौचालयाची सुविधा दिसून येत नाही. पूर्वी मुंबई दिशेला एक शौचालय होते, परंतु त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम करण्यात आले. त्यानंतर येथे शौचालय उभारण्याचा प्रशासनास विसर पडलेला दिसतो. अप्पर कोपर स्थानकात शौचालय नसल्याने महिलांना येथे दुसरी कोणतीही सोय नाही.
--------------------
डोंबिवलीतील शौचालयाला कुलूप
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक २, ३ व ५ वर शौचालयाची सुविधा आहे, परंतु सर्व शौचालयांना कुलूप असल्याने महिला प्रवाशांना शौचालयाच्या शोधात स्टेशन परिसर गाठावा लागत आहे. फलाट क्रमांक दोन वरील केवळ पुरुषांचे एक शौचालय या स्थानकात सुरू असून, बाकी सर्व ठिकाणच्या पुरुष व महिलांच्या शौचालयांना टाळे लावण्यात आले आहे.
--------------------------
ठाकुर्लीला फलाट एकवर शौचालय
ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा कायापालट झाला असून, होम प्लॅटफॉर्म व बाकी सुविधांमुळे हे स्थानक आता पहिल्यापेक्षा खूप चांगल्या स्थितीत आहे. ठाकुर्ली स्थानकात प्रवास करणारे असंख्य प्रवासी हे पूर्व दिशेने येत असून फलाट दोनवरून त्यांचा प्रवास सोयीचा आहे; मात्र शौचालय हे फलाट एकवर बांधण्यात आल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते. या ठिकाणी पैसे देऊन तुम्ही शौचालयाचा वापर करू शकता, परंतु अस्वच्छता, दुर्गंधी यांचा सामना प्रवाशांना करावा लागतो.
--------------------------------
कल्याणमधील शौचालयात पैसे देऊनही अस्वच्छता
कल्याण रेल्वे स्थानक हे जंक्शन स्थानक आहे. परराज्यांतील प्रवाशांची या स्थानकात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या ठिकाणी सात फलाट असून त्यातील फलाट क्रमांक १, २, ३ या ठिकाणी शौचालयांची सुविधा आहे. ही सर्व शौचालये ही खासगी कंत्राटदारास चालवण्यास दिली आहेत. पैसे देऊन या शौचालयांचा वापर प्रवाशांना करता येतो, परंतु पैसे देऊनही येथे अस्वच्छतेचा सामना महिलांना करावा लागतो. पाण्याची कमतरता, दुर्गंधी, आजूबाजूला साचलेली घाण अशीच परिस्थिती सर्व शौचालयांत दिसून येते.
----------------------------------------------------
--------------------------------------------------
सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीनची अनुपलब्धता
कोपर ते कल्याण रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या महिलांच्या शौचालयात सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन कोठेही दिसून आली नाही. कल्याणमधील एका शौचालयात एक मशीन आहे; परंतु तेही बंद आणि तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. महिला प्रवाशांच्या दृष्टीने ही मोठी समस्या आहे.
सुरक्षिततेचे काय?
रेल्वे स्थानकातील शौचालये ही फलाटाच्या शेवटच्या कोपऱ्यात बांधण्यात आली आहेत. या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ नसल्याने महिलांसाठी येथे असुरक्षिततेचे वातावरण आहे. या ठिकाणी पुरुषांचा जास्त राबता दिसून येतो. शौचालयाच्या ठिकाणी पैसे घेण्यासाठी ठेवलेली माणसे सातत्याने नशेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकट्या महिलेने शौचालयाचा वापर करण्यास जाणे म्हणजे तिच्यासाठी कठीण बाब ठरते.
सामान ठेवायचे कोठे?
रेल्वे स्थानकातील शौचालये म्हणजे एकदोन सीटची व्यवस्था, बाकी काही नाही. महिला प्रवासी शौचालय वापरण्यास गेल्यास त्यांच्याजवळील सामान त्यांनी कोठे ठेवायचे व फ्रेश व्हायचे कसे हाही मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
----------------------------------------------