विमान प्रवासात धुम्रमान आणि गोंधळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमान प्रवासात धुम्रमान आणि गोंधळ
विमान प्रवासात धुम्रमान आणि गोंधळ

विमान प्रवासात धुम्रमान आणि गोंधळ

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : एअर इंडियाच्या लंडन-मुंबई विमानाच्या स्वच्छतागृहात धूम्रमान करण्यासह विमानात गोंधळ केल्याप्रकरणी भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिकाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. रमाकांत करुणाकांत द्विवेदी असे या प्रवाशाचे नाव असून एअर इंडियाच्या सीनियर क्रू मेंबर शिल्पा मिश्रा यांनी द्विवेदी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
एअर इंडियाच्या ‘एआय १३०’ या विमानाने १० मार्च रोजी लंडनवरून भारतीय वेळेनुसार रात्री ९.३० वाजता मुंबईसाठी उड्डाण केले. काही वेळाने विमानाच्या स्वच्छतागृहातून धूर येताना दिसला आणि धुरामुळे अलार्म वाजू लागला. विमानातील कर्मचाऱ्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा उघडला असता, रमाकांत द्विवेदी हा आतमध्ये धूम्रपान करत होता. त्याला धूम्रपान करण्यापासून रोखण्यात आले. तसेच याबाबत वैमानिकालाही माहिती देण्यात आली. विमानातील कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो कर्मचाऱ्यांशी हातापाई करू लागला. कर्मचाऱ्यांनी त्याच्या हातातील सिगारेट आणि लायटर हिसकावून त्याला त्याच्या सीटवर बसवले.
थोड्या वेळाने रमाकांत पुन्हा सीटवरून उठला आणि त्याने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहता विमानातील प्रवासी घाबरले. त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने प्रवाशांनाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने रमाकांतचे हातपाय बांधून पुन्हा सीटवर बसवले, तरीही त्याने आदळआपट सुरू ठेवली होती. ११ मार्चला विमान मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर विमान कर्मचाऱ्यांनी रमाकांतला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
---
सुरक्षेशी तडजोड नाही!
लंडन-मुंबई विमानात एक प्रवासी स्वच्छतागृहात धूम्रपान करताना आढळला. क्रू मेंबर्सने वारंवार समजावून सांगूनही तो बेजबाबदार आणि आक्रमकपणे वागत होता. विमान मुंबईत उतरल्यानंतर त्याला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत ‘डीजीसीए’ला रितसर माहिती देण्यात आली आहे. एअर इंडिया प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन करत नाही, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिली.
--
विविध कलमांखाली गुन्हे
विमानात गोंधळ घालणाऱ्या रमाकांत द्विवेदी याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३३६ (जीविताला धोका पोहचविणे), विमान वाहतूक कायदा १९३७ च्या कलम २२ (विमानात दिलेल्या सूचनांचे पालन न करणे), कलम २३ (हल्ला करणे), कलम २५ (विमानात धूम्रपान करणे) आणि सहप्रवाशांच्या जीवाला धोका उत्पन्न करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.