
विक्रमगडमधील बेपत्ता मुलीचा पश्चिम बंगालमधून शोध घेण्यास यश
विक्रमगड, ता. १३ (बातमीदार) : टेटवाली या गावी पाहुणी म्हणून आलेल्या मुलीला दोन वर्षांपूर्वी फूस लावून पळवण्यात आले होते. तिचा पश्चिम बंगालमधून शोध लावण्यात विक्रमगड पोलिसांना यश आले. विक्रमगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फूस लावून फेब्रुवारी २०२१ मध्ये पळून नेले होते. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. गेल्या दोन वर्षांपासून पोलिस त्यांच्या मागावर होते; मात्र कोणताही थांगपत्ता लागत नव्हता. विक्रमगड पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रदीप गीते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश जगताप, पोलिस हवालदार रघुनाथ चौधरी आणि महिला पोलिस शिपाई लोखंडे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत ते पश्चिम बंगाल राज्यातील कालीचक तहसील येथे असल्याचे समजले. त्यानुसार देवाशीष मंडल याला अटक करण्यात आली. त्यास दोषारोपपत्रासह न्यायालयात हजर करण्यात आले.