
धुळीच्या प्रदुषणामुळे पालिकेकडे मुंबईकरांकडून तक्रारींची रीघ
वायुप्रदूषणाविरोधातील तक्रारींचा धुरळा!
पालिकेकडे सहाशेहून अधिक जणांकडून नाराजी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ : मुंबई शहरातील धुळीच्या प्रदूषणाच्या सुमारे ६५० हून अधिक तक्रारी सध्या महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची सातत्याने ढासळणारी स्थिती पाहता पालिकेचे प्रशासक आणि आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सात सदस्यीय समिती नेमली आहे; मात्र त्यात नागरिकांचे प्रतिनिधित्व नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. वांद्रे, माहुल, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर इत्यादी परिसरांतून नागरिकांनी धुळीच्या प्रदूषणाच्या तक्रारी केल्या आहेत.
मुंबईत हवेचे प्रदूषण वाढत चालले आहे. त्याविरोधातील नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. श्वसनाच्या तक्रारी करतानाच त्यावर उपाययोजना करण्याची विनंतीही विविध ठिकाणच्या नागरिकांनी पालिकेला केली आहे. मुंबईत सध्या पाच हजार ठिकाणी रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित बांधकामे सुरू आहेत. त्या ठिकाणांहून निर्माण होणारी धूळ नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला आदेश देण्यात आले आहेत. विविध बांधकामे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पाच्या माध्यमातून धूळ नियंत्रित करण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचेही पालिकेने यंत्रणेला स्पष्ट केले आहे. उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नियम आणि सूचनांबाबतचेही निर्देशही पालिकेकडून देण्यात आले आहेत. नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही दिले गेले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कामे थांबवा, अशीही नोटीस देण्यात येणार आहे.
नागरिकांचाही समितीमध्ये समावेश असावा
धूळ नियंत्रणासाठी पालिकेने तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा दीर्घकालीन मार्ग काढावा, अशी मागणी वातावरण फाऊंडेशनचे भगवंत केशभात यांनी केली आहे. त्यामुळे नुकतीच नेमलेली समिती आगामी हिवाळ्याच्या आधीच उपाययोजना करील असे अपेक्षित आहे. सध्याच्या समितीमध्ये एकाही नागरिकाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्याचा समावेश नाही. त्यामुळे धोरणात पारदर्शकता आणण्यासाठी नागरिकांचाही समितीमध्ये समावेश करावा, अशीही मागणी केशभात यांनी केली आहे.
‘जी २०’ परिषदेनंतर उपाययोजना थंडावल्या
- ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने काही भागांत सुशोभीकरणासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. सातत्याने परदेशातून शिष्टमंडळे बैठकीसाठी येतात अशा गेट वे ऑफ इंडिया, वांद्रे, वांद्रे-कुर्ला संकुल इत्यादी परिसरात सुशोभीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली होती.
- हवेचा गुणवत्ता निर्देशांक अधिक असणाऱ्या ठिकाणी पालिकेकडून यापुढील काळात तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.
- मुंबईत ‘जी २०’ परिषदेच्या निमित्ताने रस्त्यावर उडणारी धूळ थोपवण्यासाठी सातत्याने उपाययोजना करण्यात आल्या होत्या. रस्त्यांवरील धूळ स्वच्छ करणे, पाण्याचा शिडकावा करणे, रस्ते धुऊन काढणे इत्यादींसारख्या प्रकारांचा समावेश होता, परंतु जी-२० परिषद संपल्यानंतर मात्र उपाययोजना थंडावल्या.
- येत्या काळात म्हणजे २८ ते ३० मार्चदरम्यान परिषद होणार आहे. त्यासाठी २५ मार्चला पुन्हा मॉक ड्रील होणार आहे. त्यामुळे रस्ते देखभाल आणि इतर आवश्यक कामे वेळेत करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नागरिकांच्या सूचना
- मुख्यत्वे बांधकामाचा राडारोडा वाहून नेणारे ट्रक पूर्णपणे झाकलेले असावेत
- वाहनांच्या संख्येला आळा घालावा
- तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा दीर्घकालीन मार्ग काढावा