गावदेवी पार्कींगची अजूनही प्रतीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावदेवी पार्कींगची अजूनही प्रतीक्षा
गावदेवी पार्कींगची अजूनही प्रतीक्षा

गावदेवी पार्कींगची अजूनही प्रतीक्षा

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : ठाणे शहरातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आणि बेशिस्त पार्कींगला शिस्त लावण्यासाठी टोईंग व्हॅनचे अस्त्र उगारण्यात आले आहे. गावदेवी येथील भूमीगत वाहनतळ बंद असल्यामुळे पालिकेला टीकेचे धनी व्हावे लागत होते. त्यात ४ मार्च रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पार्किंगचे लोकार्पण करण्यात आले आहे; मात्र लोकार्पण होऊनही अद्यापही पार्कींगची सुविधाच सुरू न झाल्यामुळे एकही गाडी पार्क होऊ शकली नसल्याचेच दिसून आले.

ठाणे शहराच्या रस्त्यांवर सुमारे २१ लाख वाहनांची वर्दळ असून त्या तुलनेत पार्कीगची व्यवस्था तोकडी पडू लागली आहे. अशातच वाहनांच्या पार्किंगची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे पालिकेच्या माध्यामतून वाहनतळ उभारण्यात येत आहे. मात्र अनेक ठिकाणी वाहनतळ उभारून देखील अद्याप सुरू झाले नसल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या ताब्यात असलेले गावदेवी मार्केट, गावदेवी मैदान, कुस्तीगीर भवन इमारतीच्या बाजूला असलेला वाहनतळ ही तीनही वाहनतळे बंद ठेवणे हे महानगरपालिकेचे पार्किंग धोरण आहे का.? असा सवालदेखील या निमित्ताने उभा ठाकला आहे. या संदर्भात भाजपच्या माजी नगरसेविका मृणाल पेंडसे, कॉंग्रेसचे ओबीसी विभागाचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी आंदोलन करीत पालिका प्रशासनाला निवेदन दिले होते. अखेर याचे ४ मार्च रोजी ठाण्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीगत पार्कींग प्लाझाचेही लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर याठिकाणी दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क होऊन या भागातील कोंडी दूर होईल असे वाटत असतांनाच, आजपर्यंत या ठिकाणी एकही वाहन पार्क होऊ शकले नसल्याची माहिती पुढे आली आहे. याठिकाणी आजही पार्कींगला टाळेच असल्याचे दिसून आले आहे. ज्या एजेन्सीला काम देण्यात आले आहे. त्यांच्याकडून सुरक्षा अनामत रक्कम भरणे शिल्लक होती. ती रक्कम सोमवारी (ता. १३) भरण्यात आली असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यामुळे लवकरच हे वाहनतळ सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


.............................
पार्कींगचे दर निश्चित
दुचाकी वाहन पार्कींगचे पहिल्या दोन तासासाठी १० रुपये आकारण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील दोन ते चार तासासांठी त्यात पाच रुपये वाढीव असणार आहेत. तर त्यापुढील तासासांठी देखील पाच रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय चारचाकी वाहनांसाठी पहिल्या दोन तासांसाठी २५ रुपये आणि त्यापुढील दोन ते चार तासांसाठी अतिरिक्त ५ रुपये आणि चार तासापुढे अतिरिक्त १० रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय नाईट पार्कींगची सुविधा देखील येथे उपलब्ध असल्याने त्याचे महिन्याचे दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ओव्हर नाईट शुल्क १ हजार रुपये आकारले जाणार आहे.