सेन्सेक्स, निफ्टीची घसरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेन्सेक्स, निफ्टीची घसरण
सेन्सेक्स, निफ्टीची घसरण

सेन्सेक्स, निफ्टीची घसरण

sakal_logo
By

मुंबई, ता. १३ : अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीपाठोपाठ सिग्नेचर बँक बुडाल्याचे तेथील नियमकांनी जाहीर केल्याचा फटका आज जगातील सर्व शेअर बाजारांना बसला. त्यामुळे भारतीय शेअर बाजारही आज सुमारे दीड टक्क्यांच्या आसपास कोसळल्याने गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे मूल्य चार लाख कोटी रुपयांनी कमी झाले. सेन्सेक्स ८९७.२८ अंश, तर निफ्टी २५८.६० अंशांनी कोसळला.

अमेरिकेतील बँका कोसळत चालल्याने अमेरिकेच्या एकंदर बँकिंग विश्वाच्या स्थिरतेबद्दल जगभरातील सर्वच गुंतवणूकदार साशंक झाले. तसेच २००८ च्या सबप्राईम घोटाळ्याची पुनरावृत्ती होते की काय, या भीतीने आज अमेरिका व युरोपचे शेअर बाजारही तीन टक्क्यांच्या आसपास पडले होते. आशियाई शेअर बाजारही संमिश्र कौल दाखवत होते. त्यामुळे आज भारतीय शेअर बाजारात सकाळी सुरुवात चांगली झाल्यानंतर तासाभरातच जोरदार विक्रीचा मारा सुरू झाला आणि त्यातून कोणतेही क्षेत्र सुटले नाही. बँकिंग आणि वाहननिर्मिती क्षेत्राला सर्वात जास्त फटका बसला.

सुरुवातीला ५९,५१०.९२ अंशांवर गेलेला सेन्सेक्स तेथून दिवसभरात तो चौदाशे अंश खाली घसरून ५८०९४.५५ पर्यंत गेला होता, पण तेथून तो थोडासा सावरला आणि दिवस अखेरीस त्याने ५८ हजारांचा स्तर कसाबसा टिकवला. दिवसअखेरीस सेन्सेक्स ५८,२३७.८५ अंशांवर, तर निफ्टी १७.१५४.३० अंशावर स्थिरावला. आजच्या घसरणीमुळे शेअर बाजार पाच महिन्यांच्या नीचांकी स्तरावर गेले आहेत; तर बीएसईवरील सर्व गुंतवणूकदारांच्या एकूण मालमत्तेचे मूल्यही चार लाख कोटी रुपयांनी घसरले.

आज एनएसईमधील १,८११ शेअरचे भाव पडले होते, तर २७४ शेअरचे भाव वाढले. बीएसईवरील २,७४८ शेअरचे भाव कमी झाले, तर ७६४ शेअरचे भाव वाढले. आज निफ्टीच्या प्रमुख पन्नासपैकी फक्त चार शेअरचे भाव वाढले, तर एका शेअरचा भाव स्थिर राहिला. त्याखेरीज अन्य सर्व ४५ शेअरचे भाव कमी झाले. निफ्टीमधील टेक महिंद्र सात टक्क्यांच्या आसपास वाढला, तर अपोलो हॉस्पिटल, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, ओएनजीसी या शेअरचे भाव किरकोळ वाढले. सेन्सेक्समधील प्रमुख तीस शेअरपैकी फक्त टेक महिंद्रचा शेअर नफ्यात होता. बाकी सर्व २९ शेअरचे भाव सव्वा तीन टक्क्यांपर्यंत कोसळले होते.

निफ्टीमधील इंडसइंड बँक सात टक्के कोसळला, त्याखेरीज स्टेट बँक, टाटा मोटर, महिंद्र आणि महिंद्र, अदाणी पोर्ट या शेअरचे भाव सुमारे तीन टक्के घसरले; तर बीएसईवर इन्फोसिस, बजाज फिन्सर्व, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट, एचसीएल टेक या शेअरचे भाव पावणेदोन ते अडीच टक्के घसरले. लार्सन अँड टुब्रो, आयटीसी, एअरटेल, टाटा स्टील, एचडीएफसी, एचडीएफसी बँक या शेअरचे भावही एक टक्का घसरले.

कोट
...........
अमेरिकी बँकांच्या पडझडीमुळे जगभरातील सर्वच गुंतवणूकदार धास्तावले आहेत. आता अमेरिकी आर्थिक प्रशासनाची पुढची पावलेच जागतिक शेअरबाजारांची पुढची दिशा ठरवेल.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस.