
गैरवर्तनप्रकरणी लिपिकाची सेवा समाप्त
जुईनगर, ता. १३ (बातमीदार) : करार पद्धतीने कार्यरत असलेल्या नवी मुंबई महापालिकेतील लिपिकाची सेवा समाप्त केल्याची माहिती उपायुक्त नितीन नार्वेकर यांनी दिली. कामात गैरवर्तन केल्याचा आरोप संजय मुरबाडे याच्यावर सिद्ध झाला होता. मुरबाडे हा २०१२ पासून लिपिक म्हणून पालिकेच्या सेवेत कार्यरत होता. नवी मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागात संजय मुरबाडे कार्यरत होता. तुर्भे आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांना केसपेपर देणे, त्याचे शुल्क घेऊन ते प्रतिदिन विभाग कार्यालयातील लेखा विभागात भरणा करणे असे काम होते; मात्र मुरबाडे याने सहा महिने जमा झालेले शुल्क विभाग कार्यालयातील लेखा विभागात जमा केले नसल्याचे तपासात निदर्शनास आले. या प्रकरणी पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याच्याकडून जमा झालेले ६२ हजार रुपये शुल्क वसूल करण्यात आले. त्यानंतर त्याची सेवा समाप्त करण्याचे आदेश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.