
वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे अनुदानासाठी धरणे
मुंबादेवी, ता. १४ (बातमीदार) ः राज्यभरातून आलेल्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक आणि कर्मचारीवर्गाचे शासकीय अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू आहे. गेली वीस वर्षे विद्यार्थ्यांना विनावेतन शिकवीत असून आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी प्रा. संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार २००१ नंतरच्या कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयास शंभर टक्के वेतन अनुदान मिळावे, असे म्हटले असल्याचे प्रा. विनायक टाळकुटे यांनी सांगितले. तसेच नेट, सेट आणि पीएच.डी. यासारख्या उच्च पदव्या संपादन करूनदेखील आम्हाला विनावेतन काम करावे लागत आहे, ही मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी या वेळी नमुद केले. शासनाने अनुदान देण्यासाठी महाविद्यालयाकडून खुप वेळा माहिती मागवून घेतलेली आहे; परंतु आजपर्यंत त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सतत मागणी आणि आंदोलने करूनदेखील शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.
कायम विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना शासनाने अनुदान दिले आहे. त्याचप्रमाणे आज ना उद्या शासन आम्हालाही अनुदान देईल, या आशेपोटी आम्ही आमच्या आयुष्याची तब्बल वीस वर्षे विद्यादानाचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत. मात्र पगार मिळत नसल्याने कुटुंबाची आर्थिक स्थिती फारच नाजूक झाली आहे. आता जगावे कसे, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
– सुभाष मुरे, प्राध्यापक
भावनिक आवाहन
पगार मिळत नसल्याने आम्ही आमच्या मुला-बाळांच्या व आई-वडिलांच्या दैनदिन गरजा पूर्ण करू शकत नाही. आमच्या भावनांचा कोंडमारा होत आहे. आता दिवसेंदिवस अशा लाचारीची किळस येऊनप्रसंगी अप्रिय सामूहिक असा आत्महत्या करण्याचे विचार आमच्या मनात येत असल्याचे अमरावती येथून आलेल्या महिला प्राध्यापक कीर्ती गांधी आणि मेघा सावरकर यांनी म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकटात सापडलेल्या बहिणींचा अंत पाहू नये; आम्हाला अनुदान देऊन नोकरीत कायम करावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे.