
सीवूड्स सीबीएसई शाळेतील वर्गखोल्या वाढणार
जुईनगर, ता. १४ (बातमीदार) : सीवूड्समधील नवी मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळेच्या वाढीव वर्गखोल्यांना महापालिका प्रशासनाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढणार असल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला आहे.
सीवूड्समधील सेक्टर ५० जुने येथील महापालिकेच्या सीबीएसई शाळा क्र. ९३ मध्ये २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षासाठी नर्सरी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र येथील वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. शाळेतील तळमजल्यावर वर्ग खोल्या वाढवाव्यात, यासाठी मागील पाच वर्षांपासून माजी नगरसेवक भरत जाधव सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत होते. यासंदर्भात त्यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली होती. आयुक्तांनी वर्गखोल्यांची गरज लक्षात घेता तातडीने याकडे लक्ष देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शहर अभियंता यांनी वर्ग खोल्या वाढवण्यास हिरवा कंदील देत अंमलबजावणी करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्यानुसार येथील तळमजल्यावर वर्गखोल्या निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.
महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर वर्गखोल्या वाढण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. गरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू होते. आता पालकांची चिंता मिटली असून सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळेल, याचा आनंद आहे.
- भरत जाधव, माजी नगरसेवक