दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक
दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक

दिव्यांगांच्या मागण्यांबाबत सकारात्मक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ ः निधीअभावी अनेक कल्याणकारी योजना रखडल्या असताना ठाणे महापालिकेत मात्र दिव्यांगांसाठी मंजूर असलेला तब्बल ६३ कोटी २६ लाखांचा निधी वापराविना पडून असल्याचे उघडकीस आले आहे. दिव्यांग संघटनेने आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. या वेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदनही आयुक्तांना देण्यात आले. मागण्या रास्त असल्याचे आयुक्तांनी कबुल करत लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

ठाणे महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांच्या समस्या गेल्या अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. अनेक योजनांपासून दिव्यांग लाभार्थी वंचित असून यासंदर्भात दाद मागण्यासाठी दिव्यांग हक्क उठाव संघर्ष सामितीतील दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाने ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. या भेटीत दिव्यांगांची नोंदणी करून स्वतंत्र जनगणना करण्यात यावी, पंतप्रधान तथा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दिव्यांग लाभार्थ्यांचे आधारकार्ड संलग्न करण्यात यावे, दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम अन्वये पाच टक्के निधी वर्ग करुन दिव्यांगांना सक्षम करावे, दिव्यांगांना दरवर्षी देण्यात येणारा निधी एकत्रित स्वरुपात देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात यावे, शंभर टक्के दिव्यांग असणाऱ्यांना किमान १० हजार रुपयांची पेन्शन सुरू करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

निधीचा विसर
दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचे निर्धारित करण्यात आले आहे. मात्र, ठाणे महापालिकेकडून अपेक्षित असलेला निधीच गेले १३ वर्षे शंभर टक्के कधीच खर्च झाला नसल्याचे शिष्टमंडळातील मोहम्मद खान यांनी निदर्शनास आणून दिले. सन २०११-१२ ते सन २०२२-२३ साठी पालिकेकडून १७० कोटी २६ लाख ४० हजार १६१ रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला होता. त्यापैकी सुमारे ६३ कोटी ६६ लाख ६९ हजार ९२० रुपयांचा निधी खर्चच करण्यात आलेला नाही. ही बाबही यावेळेस युसूफ खान यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली.