
महापे एमआयडीसीतील कंपनीत दरोडा
नवी मुंबई, ता. १४ (वार्ताहर) : महापे एमआयडीसीतील सुपर स्टीम बॉयलर इंजिनियर्स प्रा.लि. या कंपनीच्या भिंतीला भगदाड पाडत चौघा लुटारूंनी कंपनीतील सुरक्षारक्षकांचे हात बांधून कंपनीतील लाखो रुपये किमतीच्या सामानाची लूट करून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या घटनेतील चौघा लुटारूंविरोधात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. सुपर स्टीम बॉलयर इंजिनीयर्स प्रा. लि. या कंपनीमध्ये बॉयलर बनवण्याचे काम केले जाते. गत रविवारी (ता. १२) रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे दोन सुरक्षारक्षक कंपनीत कामावर आले होते. यादरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चौघा लुटारूंनी या कंपनीच्या पाठीमागील भिंतीला भगदाड पाडून कंपनीत प्रवेश केला. त्यानंतर या लुटारूंनी दोन्ही सुरक्षारक्षकांना त्यांच्याजवळ हत्याराचा धाक दाखवत दोघा सुरक्षारक्षकांचे हात बांधत कंपनीतील कॉपर केबल वायर, पितळेच्या वस्तू व इतर वेगवेगळ्या वस्तू व साहित्य चोरून पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कंपनीतून पलायन केले. त्यानंतर या सुरक्षारक्षकांनी आपली सुटका करून घेत, घडल्या प्रकाराची माहिती कंपनी मालकाला दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलिसांनी कंपनीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात चौघे लुटारू कंपनीतील सामान लुटून नेत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून चौघा लुटारूंचा शोध सुरू केला आहे.