पनवेलमध्ये संपकऱ्यांची प्रभात फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये संपकऱ्यांची प्रभात फेरी
पनवेलमध्ये संपकऱ्यांची प्रभात फेरी

पनवेलमध्ये संपकऱ्यांची प्रभात फेरी

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता.१४ (वार्ताहर)ः जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, या मागणी करिता (ता.१४) मार्चपासून पनवेलमध्ये बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी, निम सरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेत्तर नगर पालिका, ग्रामपंचायत, कंत्राटी कर्मचारी, समन्वय समिती तालुका पनवेल यांच्यावतीने पनवेल पंचायत समिती येथे एकत्र येऊन घोषणाबाजी करत प्रभात फेरी काढण्यात आली होती.
जुनी पेन्शन योजना राज्य सरकारने लागू करावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार (ता. १४) पासून कर्मचारी महासंघाने बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे आरटीओ कार्यालयात सोमवारी शुकशुकाट दिसून आला. यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय झाली. बेमुदत संपामुळे पनवेल तहसील, पंचायत समिती कार्यालय आदी कार्यालयातील कामकाज आज ठप्प झाले होते. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांची मात्र गैरसोय झाल्याचे दिसून आले.
--------------------------------------
पनवेलमधील शिक्षकांची माघार
पनवेल मधील ८०० शिक्षकांपैकी १५० शिक्षक संपावर गेले होते. अशावेळी बोर्डाचे दहावी आणि बारावीचे पेपर प्रभावित होण्याची शक्यता होती. परंतु, पनवेलमधील सर्व शाळा व परीक्षा व्यवस्थित सुरू होत्या. शिक्षकांनी या संपातून माघार घेतल्याने पेपरच्या वेळी विद्यार्थ्यांवरील तणाव दूर झाल्याची माहिती गटशिक्षण अधिकारी सीताराम मोहिते यांनी दिली आहे.