आंध्रप्रदेश मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावाने फसवणूक

आंध्रप्रदेश मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावाने फसवणूक

आंध्र प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावाने फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे सचिव नागेश्वर रेड्डी यांच्या नावाचा वापर करून एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी २८ वर्षीय व्यक्तीला सायबर गुन्हे शाखेने आंध्र प्रदेशमधून अटक केली आहे. नागराजू बुडुमुरू असे आरोपीचे नाव असून तो मूळचा आंध्र प्रदेशचा रहिवासी आहे. आरोपीने मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावाने एका इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला फोन करून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूला स्पॉन्सरशिप देण्यास सांगून मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावे फोन
डिसेंबर २०२२ मध्ये कंपनीच्या कार्यालयाशी आरोपीने संपर्क केला. संपर्क साधल्यानंतर आरोपीने स्वतःला आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा सचिव म्हणून खोटी ओळख सांगितली. फोन कॉलवर त्यांनी कंपनीच्या एमडीचा संपर्क क्रमांक मागितला. दक्षिण आफ्रिकेच्या एका माजी क्रिकेटपटूला स्वत:साठी क्रिकेट किट विकत घेण्याची गरज असून त्याला १२ लाख रुपयांच्या प्रायोजकत्वाची गरज असल्याचे आरोपीने फोनवर सांगितले होते. आरोपीने कंपनीकडून विविध खात्यांवर ७.६६ लाख रुपये वळते केले.

फसवणूक झाल्याचे उघड
कंपनीला त्यांच्याशी संपर्क साधलेल्या व्यक्तीने फसवणूक केल्याचे लक्षात आले आणि १३ जानेवारीला याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. पथकाने संशयिताचे तपशील, त्याने वापरलेली बनावट कागदपत्रे आणि कंपनीला ७.६६ लाख रुपयांची फसवणूक करण्यासाठी वापरलेल्या बँक खात्याचा तपशील गोळा केला.

पोलिस तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर क्राईम सेलच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने या प्रकरणात तांत्रिक पुराव्यांचा वापर करत संशयिताचे ठिकाण शोधण्यात यश मिळवले. त्याप्रमाणे पोलिसांचे पथक आंध्र प्रदेशला रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला श्रीकाकुलम येथे ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने कारवाया करण्यासाठी क्रिकेटपटूचा बनावट ई-मेल आयडी तयार केला होता. इलेक्ट्रॉनिक कंपनीला फसवण्यासाठी त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी आणि आंध्र क्रिकेट असोसिएशनची बनावट कागदपत्रे व्हॉट्सअॅपद्वारे कंपनीला पाठवली. आरोपीकडून अशाच प्रकारची आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com