
जीर्ण घरांवर सीवूडसमध्ये तोडगा
जुईनगर, ता. १५ (बातमीदार) : नेरूळ-सीवूडस येथील सिडकोनिर्मित जीर्ण घरांचा प्रश्न अजूनही कायम आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघावा, यासाठी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे व पुनर्विकास अभ्यासक सुनील चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सीवूडस येथील सेक्टर ४८ मधील गणेश मैदानात शनिवारि (ता. १८) सायंकाळी सहा वाजता पुनर्विकास परिषद होणार आहे.
सिडको प्रशासनाने डीआरएस ८७ योजनेअंतर्गत सीवूड्समध्ये सेक्टर ४६ ,४८, ४८ ए या ठिकाणी ३२ गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून एकूण ३,८२४ सदनिका बांधलेल्या आहेत. या घरांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याकारणाने सुरुवातीपासून आजपर्यंत इमारतींना तडे जाणे, स्लॅब कोसळणे, पाणीगळती अशा घटना वारंवार घडत आहेत. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याविषयी माजी नगरसेवक भरत जाधव यांनी वारंवार सिडकोकडे आंदोलने करून पाठपुरावा केला आहे. त्यामुळे बऱ्याच सदनिकांची दुरुस्ती सिडकोने केली आहे; पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ३२ गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास करणे हाच एकमेव पर्याय राहिला आहे. याच अनुषंगाने पुनर्विकासाबाबतची कायदेशीर माहिती व प्रशासकीय बाबी, पुनर्विकासाचे नफा-तोटा याबाबत पुनर्विकास परिषदेतून मार्गदर्शन केले जाणार आहे.
--------------------------------------------------------
पुनर्विकास परिषदेतून जनजागृतीला सुरुवात केल्यानंतर अनेक विकासकांनी संपर्क साधला आहे. तसेच सीवूडसप्रमाणे वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरूळ, पनवेल परिसरातील पुनर्विकासाचे प्रकल्प बंद पडलेल्या बऱ्याच संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी संपर्कही केला. त्यामुळे भविष्यात कोणत्याही गृहनिर्माण संस्थेत अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी हा प्रयत्न आहे.
- भरत जाधव, माजी नगरसेवक, भाजप