
धूर, धुळीमुळे दिवेकरांचे आरोग्य धोक्यात
दिवा, ता. १९ (बातमीदार) : दिवा शहरातील ठाणे महापालिकेचे डम्पिंग ग्राऊंड जानेवारीच्या अखेरीस मोठा गाजावाजा करत बंद झाले; मात्र डम्पिंगच्या धूर आणि धुळीमुळे आजही दिवा शहरातील नागरिकांचा श्वास गुदमरत आहे. यामुळेच परिसरातील नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत असून, दवाखान्यात रुग्णांची गर्दी वाढत आहे.
दिवा शहरात धुराचे आणि धुळीचे प्रमाण मागील १५ ते २० दिवसांपासून प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता घसरली आहे. धूर आणि धुळीमुळे दिवा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दिवा शहरातील वाढत्या धूळ आणि धुराच्या प्रमाणामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले असून, अशा वातावरणामुळे दमा व लहान मुलांमध्ये खोकल्याचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत ठरते, असे येथील डॉक्टर सांगतात. डम्पिंग ग्राऊंड बंद केल्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने येथील डम्पिंगमधून निघणारा धूर व धूळ यावर प्रक्रिया होणे अपेक्षित होते.
ठाणे महापालिका प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना केल्या नसल्याने दिवा शहरात धुराचे व धुळीचे साम्राज्य असल्याचा आरोप आता दिव्यातील जाणकार नागरिक करत आहेत. एकीकडे डम्पिंग ग्राऊंड बंद झाल्याचा आनंद दिवावासीयांना असतानाच दुसरीकडे बंद झालेल्या डम्पिंग ग्राऊंडमधून सतत निघणारा धूर आणि धूळ यामुळे आरोग्य धोक्यात येत असल्याच्या तक्रारी दिवा शहरातील स्थानिक नागरिक करत आहेत.
-------------------------------
पालिकेचा निष्काळजीपणा कारणीभूत...
सायंकाळच्या वेळेला दिवा शहरातील धुराचे आणि धुळीचे प्रमाण स्पष्टपणे जाणवते. रस्त्याने चालत जाणारे नागरिक पालिकेच्या निष्काळजीपणाची चर्चा करतात. नागरिकांना अक्षरशः नाकावर रुमाल घेऊन चालावे लागते. मास्क लावण्याशिवाय लहान मुले, वृद्धांना पर्यायच शिल्लक राहत नाही.
वाढलेल्या धूर आणि धूळ प्रदूषणामुळे मोकळा श्वास दिव्यातील नागरिक घेऊ शकत नाहीत. शहरातील अनेक इमारतींच्या घरांमध्ये धूळ साचलेली पाहायला मिळते. राहत्या घरात दररोज येणारी धूळ अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे.
डम्पिंग ग्राऊंडवर लागणारी आग विझवण्याचे काम वेळेत होत नाही. परिणामी, दिवा शहरातील नागरिकांना धुराच्या समस्येला सामोरे जावे लागते. ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने ही समस्या गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देणे गरजेचे असून, केवळ डम्पिंग ग्राऊंड बंद करून दिव्यातील प्रदूषणाचा प्रश्न सुटणार नाही.
-------------------------
तातडीने उपाययोजनांची मागणी
बंद केलेल्या डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. डम्पिंग ग्राऊंडवरून निघणारा धूर व धुळीमुळे दिवा शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरातील डॉक्टरांकडे खोकल्याच्या रुग्णांची वाढलेली संख्या हे त्याचे बोलके उदाहरण आहे. महापालिकेने याचे सर्वेक्षण केल्यास धूळ आणि धुरामुळे दिव्यात आजारी पडणारी लहान मुले व नागरिक याचा अंदाज महापालिका प्रशासनाला येईल. प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणी नागरिक करत आहेत.
----------------
कोट
धूर आणि धुळीमुळे दिव्यातील नागरिकांना खोकला लागण्याचे प्रमाण जास्त आहे. माझ्या घरातील व्यक्तींना दोनदा डॉक्टरकडे घेऊन गेले होते. एकदा खोकला सुरू झाला की दोन ते तीन दिवस तो थांबतच नाही. तो अजून वाढत जातो. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची विल्हेवाट लवकरच लावायला हवी.
- किशोरी फागे, गृहिणी
------------------------
दिवा डम्पिंगवर साठलेल्या कचऱ्याचे विघटन करण्यात येणार आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ६० टक्के निधी मिळणार आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेनेही आराखडा बनवला आहे. त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून वर्क ऑर्डर काढली जाईल. प्रत्यक्षात या वर्षीच मे महिन्यापर्यंत या कामालाही सुरुवात होईल. बायो मायनिंग प्रक्रियेद्धारे साचलेला कचरा उकरून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. सुमारे दोन वर्षे हे काम चालेल.
- अभिजीत बांगर, पालिका आयुक्त, ठाणे