
ठाण्यातील शौचालये कात टाकणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : ठाणे शहरातील झोपडपट्टी भागातील शौचालयांची अवस्था बिकट आहे. हे लक्षात घेत मुख्यमंत्र्यांनी शौचालयांची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे महापालिकेने शहरातील ९०० शौचालयांचे सर्वेक्षण केले. यातील ७०० शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी तब्बल ७३ कोटींहून अधिकचा निधी खर्ची केला जाणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली.
राज्याची सूत्रे एकनाथ शिंदे यांनी हाती घेतल्यानंतर ‘मुख्यमंत्र्याचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत सौंदर्यीकरणाला विशेष महत्त्व देण्यात आले. यामध्ये खड्डेमुक्त रस्त्यांबरोबर शहरातील भिंती बोलू लागल्या. त्याचबरोबर स्वच्छतेबाबतीत काळजी घेण्यात आली. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यात ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. ठाणे महापालिका हद्दीत ९०० शौचालये असून त्या ठिकाणी सुमारे १३ हजार सीट्स आहेत. मागील काही वर्षांत या सार्वजनिक शौचालयांची अवस्था फार दयनीय झालेली आहे. कुठे कडी-कोंयडा तुटलेला, पाणी नसणे, विजेची व्यवस्था नसणे आदींसह इतर असुविधा दिसून येत आहेत, परंतु आता येत्या काही दिवसांत सार्वजनिक शौचालये कात टाकणार असल्याचे दिसत आहे.
ठाणे महापालिकेने शहरातील सार्वजनिक शौचालयांचे सर्वेक्षण केले असून त्यानुसार ९०० पैकी ७०० शौचालयांची दुरुस्ती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार या कामांची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली असून येत्या महिनाअखेरपर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. शहरातील ७०० शौचालयांपैकी काही शौचालयांची किरकोळ; तर काही शौचालयांची मोठ्या स्वरूपाची दुरुस्ती केली जाणार आहे. यामध्ये दरवाजे, खिडक्या, पाण्याची टाकी बसवणे, कडी कोंयडा बसवणे, विजेची सुविधा आदींसह इतर कामे केली जाणार आहेत. यासाठी शासन २५ कोटी, महापालिकेच्या मागासवर्गीय निधीतून १३ कोटी, अण्णाभाऊ साठे योजनेतून ९.०५ कोटी, आणि नगरविकास विभागाकडून २५ कोटी अशा स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.
...........................
कंटेनर टॉयलेटची निर्मिती
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कंटेनर टॉयलेटची संकल्पना पुढे आणली गेली आहे. वागळे इस्टेट रोड क्रमांक २२ येथे पहिले कंटेनर टॉयलेट उभारण्यात आले आहे. या ठिकाणी दोन मुतारी व तीन ते पाच सीट्स उपलब्ध असणार आहेत. त्यात विदेशी आणि देशी सीटसचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. अशा स्वरूपाचे ७५ टॉयलेट उभारले जाणार आहेत.