
अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट
पालघर जिल्ह्यात खासगी प्रवासी वाहतुकीसाठी एक उत्तम पर्याय म्हणून रिक्षाचालकांकडे पाहिले जाते. कोरोना काळात देखील रिक्षाचालकांमार्फत सेवा दिली गेली. मात्र, अलीकडील काळात जिल्ह्यात फोफावलेल्या अनधिकृत रिक्षांच्या प्रस्थामुळे प्रामाणिकपणे नियमांचे पालन करून व्यवसाय करणाऱ्या चालकांची गळचेपी होत आहे. स्थानिक प्रशासनाची कारवाई तोकडी पडत असलेल्या मार्गावर अनधिकृत रिक्षा जादा प्रवासी घेऊन सुसाट धावत आहेत. जिल्ह्यात अधिकृत रिक्षांचा आकडा ३० हजार ४५० व सहा आसनी रिक्षांचा आकडा ४ हजार ५५० इतका आहे. मात्र, या व्यतिरिक्त हजारोंच्या संख्येने अनधिकृत रिक्षा रस्त्यावर फिरत असल्याचे पोलिस कारवाईनंतर समोर येत असून, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. दैनंदिन प्रवासात महत्त्वाचा घटक असणाऱ्या रिक्षांचा ‘सकाळ’ टीमने घेतलेला आढावा...
-------------------------------------------------------
-----------------------------------------------------
वसई-विरारमध्ये लगाम गरजेचा
प्रसाद जोशी, वसई
लोकलने प्रवास करण्यासाठी नागरिक रिक्षांचा आधार घेतात. शहरात अधिकृत रिक्षातळ असून याठिकाणी प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसायासाठी रांगेत चालक उभे असतात; मात्र, अनधिकृत रिक्षाचालक हे मोक्याच्या, सार्वजनिक गर्दी असणाऱ्या ठिकाणी बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करून प्रवासी वाहतूक करत आहेत. एकीकडे स्थानिक पोलिस प्रशासन कारवाई करत असले तरी मात्र दुसऱ्या दिवशी परिस्थिती ‘जैसे थे’ असते. त्यामुळे वाहतूककोंडी देखील निर्माण होत असते. वसई स्टेशन स्काय वॉक, बस डेपो मार्ग, अंबाडी सिग्नल मार्ग, माणिकपूर, वसई पूर्वेकडील नवघर, सातिवली, वालीवसह मुख्य मार्गाला रिक्षांचा विळखा कायम दिसून येतो.
----------------------
नालासोपाऱ्यात धोकादायक प्रवास
नालासोपारा पूर्वेला तुळींज येथे पोलिस ठाण्याच्या नाकाला टिचून रिक्षा उभ्या केल्या जातात. त्यामुळे तुळींज मार्ग, ओसवाल मार्ग व आचोळे मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असते. जादा प्रवासी घेऊन देखील धोकादायक प्रवास केला जातो. पश्चिमेला स्काय वॉकखाली रिक्षातळ असताना समोर देखील प्रवाशांना घेण्यासाठी रिक्षा उभ्या केल्या जात असल्याने रस्ता अरुंद होत आहे. एकीकडे रिक्षा परवाने मिळाल्यामुळे रिक्षांच्या संख्येत वाढ झाली असताना त्यात अनधिकृत रिक्षांची भर पडली आहे. बेशिस्तपणे रिक्षा उभ्या केल्याने संपूर्ण स्टेशन परिसरात कोंडी होते. प्रवासी इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षात बसला तरी किमान पंधरा ते वीस मिनिटे त्याला तिथून हलता येत नाही.
----------------------
विरारमध्ये नागरिकांना चालणे मुश्किल
विरार पूर्वेकडे रेल्वे स्थानक पूल, स्काय वॉक, अरुंद रस्ते आणि त्यात अनधिकृत रिक्षांची डोकेदुखी वाढत आहे. याठिकाणी उभ्या केलेल्या अस्ताव्यस्त रिक्षांमुळे नागरिकांना चालणे देखील मुश्किल होत आहे. स्थानिक प्रशासनाकडून या प्रकाराची तात्पुरती दखल घेतली जाते. मात्र, यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही. पश्चिमेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रेल्वेतून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही रस्त्यावरून चालताना अडचण होते. मनवेल पाडा, विरार भुयारी मार्ग परिसर, फुलपाडा येथेही अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट असतो. रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात अशा रिक्षा धावत असतात. विनापरवाना, कागदपत्रांचा अभाव, तसेच अन्य नियमांचे उल्लंघन केले जात असेल तर कारवाईचा बडगा उगारणे गरजेचे असते. परंतु, कारवाईदरम्यान यातील अनेक रिक्षा दिसेनाशा होतात. त्यानंतर पोलिसांची नजर चुकवून पुन्हा मार्गावर धावतात.
------------------------------
बेकायदा कुरघोडी...
गेल्या चार वर्षात १८ हजार रिक्षा परवाने वितरित झाले आहेत, त्यामुळे रिक्षेच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु हे अधिकृत असले तरी हे रिक्षावाले मात्र बेकायदा कुरघोडी करत असून, त्यांना लगाम घालण्याची आवश्यकता आहे. अन्यथा महामार्ग, शहरातील सार्वजनिक मार्गावर कोंडी फोडताना स्थानिक प्रशासनाला घाम फुटणार आहे.
--------------------
पालघर जिल्ह्यातील अंदाजे तीन व सहा आसनी रिक्षा
तालुका-तीन आसनी-सहा आसनी
पालघर - १५००-४००
बोईसर - ५५००-५००
वसई - १६०००-२०००
डहाणू - ९००-१५०
वाणगाव - १००-१००
तलासरी - २००-१५०
बोईसर - ५५००-५००
सफाळे - २५०-१००
मनोर - २५०-१५०
वाडा - १००-१५०
विक्रमगड - ५०-१५०
जव्हार - ५०-१५०
मोखाडा - ५०-०
-----------------
कोट
रिक्षांची तपासणी केली जाते. तपासणीच्या वेळी आढळणाऱ्या बेकायदा रिक्षांवर कारवाई करण्यात येत आहे. नालासोपारा, विरार भागात कारवाई सुरूच आहे. वाहतूक सुरळीत कशी राहील याकडे आमचा कल असून, वाहतूक कर्मचारी गर्दीच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत.
-प्रशांत लांघी, पोलिस निरीक्षक
-------------------
आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगत नियमाला धरून प्रामाणिकपणे रिक्षा व्यवसाय केला जातो. मात्र अनधिकृतपणे मार्गावर धावणाऱ्या रिक्षांमुळे अडसर निर्माण होत असतो. अशांवर कारवाईचा बडगा उगारून अधिकृत रिक्षाचालकांना दिलासा द्यावा.
-विजय खेतले, अध्यक्ष, ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघ
------------------
निश्चित दरापेक्षा जास्त भाडे आकारणे किंवा बेकायदा रिक्षा चालवणे यावर उपप्रादेशिक परिवहन विभागाचे पथक तपासणी करून कारवाई करत असते. जादा भाडे आकारणाऱ्यांचे परवाने देखील रद्द केले आहेत.
-दशरथ वाघुले, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन विभाग