
नेहरू नगर रहिवाशांची पाण्याकरिता वणवण!
नेहरूनगर रहिवाशांची
पाण्यासाठी वणवण
चेंबूर, ता. १६ (बातमीदार) ः कुर्ला नेहरूनगर परिसरात दोन ते तीन दिवसांपासून पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी रहिवाशांना टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
नेहरूनगर परिसरात एकूण १३ ते १४ इमारती आहेत. काही इमारतींच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. सध्या परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी केदारनाथ मंदिरजवळ फुटली आहे. पालिका कर्मचारी गळतीचा शोध घेत असून दोन-तीन दिवस उलटले, तरी जलवाहिनी दुरुस्त झालेली नसल्याने रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. परिसरात दोन-तीन दिवस पाणीटंचाई जाणवत आहे. रहिवाशांवर पाण्याकरिता वणवण भटकण्याची वेळ आली आहे. पालिकेने टँकरची व्यवस्था केलेली नसल्याने रहिवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. लवकरात लवकर पालिकेने जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक बाळा नाईक यांनी केली आहे.