
एपीएमसीतील बेकायदा हुक्का पार्लरवर कारवाई
नवी मुंबई, ता. १६ (वार्ताहर) : एपीएमसी पोलिसांनी पामबीच गॅलेरिया मॉलमधील कबाना लॉजमध्ये बेकायदा सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर छापा मारून चौघांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर जप्त केले आहेत.
एपीएमसीतील पामबीच गॅलेरिया मॉलमधील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कबाना लॉजमध्ये छुप्या पद्धतीने हुक्का पार्लर चालवण्यात येत असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक वसीम शेख यांच्या पथकाने बुधवारी (ता. १५) रात्री ११.३० च्या सुमारास कबाना लॉजवर छापा मारला. या वेळी लॉजमध्ये काही व्यक्ती महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या हुक्क्याचे फ्लेवर पीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कबाना लॉजचा मॅनेजर सोहेल खान (२२) व वेटर नितीन गार्गव (१९), सुजल कनौजीया (१८) आणि जावेद पठाण (२२) विरोधात कोफ्टा कायद्यानुसार गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे.