
येऊरमधील अतिक्रमणांविरोधात ग्रामस्थ आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे शहराला लागून असलेल्या हिरवाईने नटलेल्या येऊरला अनधिकृत व बेकायदा बांधकामांची बाधा लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या धाबे, हॉटेल आणि टर्फमुळे प्राणी, पक्ष्यांना धोका निर्माण झाला असून वटवाघुळे, घुबड, गिधाड, ससाणा, बिबटे यांसारखे प्राणी-पक्षी दिसेनासे झाले आहेत. अनेक प्राणीदेखील गायब होत असल्याची भीती येऊर आदिवासी वनहक्क समितीने व्यक्त केली असून, या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ठाण्याचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊर येथे दिवसेंदिवस धाबे, हॉटेल तसेच काही खासगी बंगल्यांमध्ये लग्नसमारंभ आणि राजकीय नेत्यांचे वाढदिवस यानिमित्ताने मोठ्या पार्ट्यांचे आयोजन करण्यात येत आहे. या पार्ट्यांतील कानठळ्या बसवणारे संगीताचे आवाज, विद्युत रोषणाई, खेळांसाठी बेकायदा उभारण्यात आलेल्या टर्फमध्ये प्रखर प्रकाश झोतामुळे त्याचा प्राण्यांवर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप वनहक्क समितीने केला आहे. यापूर्वी गावात वटवाघुळे, टिटवी, घुबड, गिधाड, काजवे, ससाणा पक्षी दिसत होते. आता हे पक्षी गावात दिसत नाहीत. वाहतूक, वृक्षतोड आणि प्रकाशामुळे बिबट्या, तरस, रानमांजर, हरीण, भेकड, बेडूकही आता दुर्मिळ झाले आहेत.
.............
तीव्र आंदोलनाचा इशारा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिवासींचे म्हणणे ऐकून जंगले वाचवली पाहिजेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करून बेकायदा हॉटेल, टर्फ बंगले यांच्यावर पाडकामाची कारवाई करण्यात यावी. येऊरमध्ये बाहेरून येणाऱ्यांविरोधात कठोर निर्बंध लागू करणे आवश्यक आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा समितीने दिला आहे.