
अमृता फडणवीस यांना एक कोटीची लाचेची ऑफर एक कोटीची लाचेची ऑफर
उल्हासनगर, ता. १६ (वार्ताहर) : बुकी असलेल्या फरारी वडिलांना गुन्ह्यातून सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका फॅशन डिझायनर महिलेने एक कोटी रुपयांच्या लाचेची वारंवार ऑफर दिल्याची बाब समोर आली आहे. या डिझायनर महिलेविरोधात मलबार हिल पोलिस ठाण्यात अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिक्षा असे या महिलेचे नाव असून ती कुख्यात बुकी अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. पोलिसांनी तिला आज उल्हासनगरमधून ताब्यात घेतले.
अनिक्षा १६ महिन्यांपूर्वी अमृता यांच्या संपर्कात आली होती. काही दिवसांपासून तिने अमृता यांच्याकडे एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी केली. त्या बदल्यात त्यांना एक कोटीची लाच देण्याची ऑफरही देण्यात आली. अमृता फडणवीस यांच्या तक्रारीवरून अनिक्षा आणि वडिलांविरोधात धमकावणे, कट रचणे आणि लाचेची ऑफर देणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विषयावर आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत प्रश्नदेखील उपस्थित केला होता. अनिक्षा उल्हासनगर कॅम्प नंबर एक परिसरात मायापुरी या इमारतीत राहते. आपण डिझाईन केलेले कपडे आणि दागिने अमृता यांनी सार्वजनिक कार्यक्रमात घालावे, अशी विनंती तिने केली होती. यानंतर सागर बंगला आणि विविध कार्यक्रमांत अनिक्षाशी भेट झाली असल्याचेही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटले आहे. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर अनिक्षाने अमृता यांना पोलिसांना सट्टेबाजांवर कारवाईच्या सूचना देऊन आपण पैसे कमवू शकतो. कारवाई न करण्यासाठीही सट्टेबाजांकडून पैसे घेऊ शकतो, असे सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
...
फोनवरून वारंवार विनंती
अनिल जयसिंघानी यांच्यावर एका गुन्ह्यात आरोप करण्यात आले असून त्या प्रकरणातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये देण्याची तयारी असल्याचे अनिक्षाने सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही विनंती अमृता यांना फोनद्वारे केली होती. व्हॉट्सअॅपवरून व्हिडीओ क्लीप, व्हॉईस नोटसही पाठवले होते. त्यानंतर हा नंबर आरोपी अनिक्षा हिच्या वडिलांचा असल्याची माहिती अमृता यांनी पोलिसांना दिली होती.