
जुन्या पेंशनच्या मागणीचा संप चिघळणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी १४ मार्चपासून सरकारी, निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. परिणामी कार्यालयीन कामकाज ठप्प आणि नागरिकांचे हाल होत आहे. मुंबईतील विविध विभागांच्या ६५ संघटना सध्या संपात सामील झाल्या असून, येत्या २७ मार्चपर्यंत जुन्या पेन्शनच्या मागणीसंदर्भात निर्णय न झाल्यास २८ मार्चपासून राज्यातील सर्व राजपत्रित अधिकारीदेखील आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्य सरकारला दिला आहे.
मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये ओस पडली आहेत. परिणामी शासकीय कामकाज खोळंबले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोज आपल्या कामासाठी फेऱ्या माराव्या लागत आहे. शैक्षणिक किंवा योजनांच्या संबंधित प्रकरणांची नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतूचे कामकाज सुरू असले, तरी त्याला मंजुरी मिळवण्यासाठी आणि पुढील प्रशासकीय नोंदणीचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे संपाचा परिणाम चौथ्या दिवशीही कायम दिसून येत आहे.
---------
लोकलच्या प्रवाशांमध्ये घट
नियमितपणे प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गातील कर्मचारी संपावर गेल्याने १४ मार्चपासून अचानक लोकलचे प्रवासी घटले आहेत. कार्यालयीन कामकाज संपल्यानंतर घरी परत जाताना सायंकाळी ५.३० नंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर दिसणारी प्रवाशांची झुंबड गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत नसून, सुमारे ५० ते ६० टक्के प्रवासी संख्या घटली आहे.
---------------
आरटीओ विभागातील कामे खोळंबली
परिवहन विभागातील आरटीओचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. मात्र मोटार वाहन निरीक्षक अद्याप कामावर असल्याने शिकाऊ परवाने, पक्के परवाने आणि वाहन फिटनेसची कामे वगळता इतर सर्व कामे सध्या बंद आहेत. २८ मार्च रोजी राजपत्रित अधिकारी असलेले आरटीओ अधिकारीसुद्धा संपात सहभागी झाल्यास, आरटीओ कार्यालयातील काम पूर्णपणे ठप्प होणार आहे.
--------------
जुनी पेन्शन लागू असणारे कामावर परतले
२००३ पूर्वीच्या ज्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे, ते कर्मचारीसुद्धा नाईलाजास्तव सहकारी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी संपात सहभागी झाले होते; मात्र १६ मार्चपासून जुनी पेन्शन लागू असलेल्या कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेत कामावर हजर होत असल्याचे त्या कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
---------------
मंत्रालयातील सर्व राजपत्रित अधिकारी येत्या २८ मार्चपासून संपात सहभागी होणार आहे. त्यासाठी १३ मार्च रोजीच महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्य सरकारला पत्र दिले आहे.
- विनोद देसाई, अध्यक्ष, राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ
मुंबईच्या डबेवाल्यांना फटका
कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईत कार्यालयात डब्बा पोहोचवणारा डबेवालाही अडचणीत सापडला आहे. कर्मचारी कामावर जात नसल्यामुळे डब्यांची संख्या ५० टक्काने कमी झाली आहे. आधीच कोविड काळात ग्राहकांची संख्या घटली आहे. त्यामुळे आता आमच्या पोटावर पाय देऊ नका, वाटाघाटीतून या संपावर मार्ग काढा, अशी आर्त हाक मुंबई डबेवाला संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.
कोविड संसर्गात आमच्या व्यवसायाची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली. कोविड संपला आमि कसेबसे तग धरतोय, तोच संप सुरू झाला. या संपामुळे आमचे नुकसान होत आहे. आधीच आमच्या न्याय्य हक्काच्या मागण्यांवर सरकार काहीच निर्णय घेत नाही. त्यामुळे जनतेच्या आणि आम्हा डबेवाल्यांच्या भल्यासाठी लवकरात लवकर या संपावर तोडगा निघावा.
- विष्णू काळडोके, मुंबई डबेवाला संघटना