
गृहखरेदीची गुढी गगनाला !
वाशी, बातमीदार
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांकडूनदेखील आकर्षक जाहिराती केल्या आहेत. अशातच कोरोना काळानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने बाजारातही उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला शंभर कोटींच्या घरात गृहखरेदी क्षेत्रात उलाढाल होण्याचा अंदाज बांधकाम व्यावसायिकांकडून वर्तवला जात आहे.
----------------------------------------------
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त घर खरेदीला ग्राहकांची पसंती मिळत असते. कारण सणानिमित्त नवीन काहीतरी विकत घेण्याकडे अनेकांचा कल असतो. नवी मुंबईमध्ये बांधकाम क्षेत्रात गुढीपाडव्याच्या औचित्याने कोट्यवधींची उलाढाल होणार असून शहरातील, तसेच लगतच्या परिसरातील फ्लॅट्स आणि प्लॉट्स बुकिंगला जोर धरू लागले आहे. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदाही बांधकाम क्षेत्रात खरेदी-विक्रीचा उत्साह अधिक वाढला आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी विविध सवलतींचा वर्षाव केला आहे. यात घराच्या मूळ किमतीसोबत मोठ्या इमारतींच्या कॅम्पसमध्ये असलेल्या सुविधांच्या रकमेत सूट, फ्री फर्निचर, तसेच व्याजदरावर दोन टक्के सूट अशा विविध आकर्षक ऑफर्स बांधकाम व्यावसायिकांनी दिल्या आहेत. शिवाय, नवी मुंबई क्षेत्रामध्ये सिडकोकडून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ईडब्लूएस व एलआयजी गटांसाठी लॉटरी काढली आहे. त्यामुळे जवळपास तीस हजार घरे सिडकोकडून उपलब्ध करून देण्यात आली असल्याने ३० ते ५० लाखांतील फ्लॅट बुकिंगला सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे यंदा बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीचा उत्साह पाहता गुढीपाडव्याला प्रॉपर्टी बुकिंगची गुढीही गगनाला भिडेल, असा आशावाद बांधकाम व्यावसायिकांकडून व्यक्त केला जात आहे.
----------------------------------
खासगी गृहप्रकल्पांना मागणी
सिडकोच्या तळोजा, उलवे या परिसरात सिडको तसेच खासगी विकासकांच्या घरांचे दर हे जवळपास सारखेच असल्यामुळे ग्राहकांचा कल खासगी विकासकांकडे आहे; तर सिडको आणि खासगी विकासकांचे घर विकत घेणारा ग्राहक हा एकच नसल्याचे काहींचे म्हणणे आहे. खासगी घरांचे दर जास्त असल्यामुळे बेकायदा बांधकामांमध्ये देखील घर घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
----------------------------------
शंभर कोटींची उलाढाल
शहरात ९०० च्या आसपास लहान व मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यापैकी बहुतांश बांधकाम व्यावसायिकांकडे बुकिंगसाठी सध्या जोर आहे. शहरातील सध्याची उलाढाल लक्षात घेता गुढीपाडव्यापर्यंत १०० कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होईल, असा अंदाज बांधकाम व्यावसायिकांकडून वर्तवला जात आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी विविध ऑफर्स जाहीर केल्या आहेत. खरेदीच्या रकमेत सूट देण्यापासून फ्री फर्निचरपर्यंतच्या ऑफर्स असल्याने ग्राहकांची बुकिंगला पसंती मिळत आहे.
-------------------------------------
सिडको व राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे बांधकाम व्यवसायाला नवी मुंबईत उतरती कळा लागली आहे. सिडकोकडून नवीन बांधकामांसाठी परवानगी देण्यात येत नाही. ग्राहक घर घेण्यासाठी सज्ज आहेत, पण नवीन प्रोजेक्ट बनत नसल्याने गैरसोय होत आहे.
- प्रकाश बावीस्कर, सचिव, मराठी बांधकाम व्यावसायिक महासंघ