आर्ट फेस्टिव्हलमध्ये रसिक मंत्रमुग्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आर्ट फेस्टिव्हलमध्ये रसिक मंत्रमुग्ध
आर्ट फेस्टिव्हलमध्ये रसिक मंत्रमुग्ध

आर्ट फेस्टिव्हलमध्ये रसिक मंत्रमुग्ध

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या माध्यमातून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराच्या प्रांगणात शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. १६ ते १९ मार्च या कालावधीत चालणाऱ्या फेस्टिव्हलच्या गुरुवारी पहिल्याच दिवशी अवकाळी पाऊस आल्याने गझलगायक पंकज उदास यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता. यामुळे आयोजकांप्रमाणे मोठ्या संख्येने कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या हजारो रसिकांचा हिरमोड झाला होता. शुक्रवारी (ता. १७) आघाडीचा पार्श्वगायक अमित त्रिवेदी यांच्या गाण्यांनी तरुणाईसह आबालवृद्धांनी ठेका धरायला भाग पाडले; तर पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल भक्तिगीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
शुक्रवारी (ता. १७) हिंदी गायक अमित त्रिवेदी यांचा कार्यक्रम असल्याने रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली आणि गर्दीचा उच्चांक मोडला. आयोजकांच्या माहितीनुसार सुमारे ६० हजार रसिक उपस्थित होते. या वेळी अमित त्रिवेदी आणि त्यांच्या सहकलाकारांनी जजबा, दोस्ती, जयकाल, महाकाल, नैना दा क्या कसूर, एक कुडी, जाने बलमा घोडे पे क्यू सवार है, नवराई माझी लाडाची, अशी एकापेक्षा एक गाणी सादर करून उपस्थितांना ठेका धरायला लावला. नृत्याविष्कारासह सादर केलेल्या गाण्यांवर तरुणाईची पावले थिरकली आणि ठेका धरायला लावला. या वेळी विविध राज्यातील संस्कृती दर्शवणारी गाणी सादर करण्यात आली. आमदार डॉ. बालाजी किणीकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी; तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक या वेळी उपस्थित होते.


--------------------
भक्तिगीतांनी शिवमंदिराचे प्रांगण मंत्रमुग्ध
फेस्टिव्हलच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. १८) अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आणि भक्तीपूर्ण भक्तिगीतांनी पहाट साजरी झाली. पहाटे सहापासून शिवमंदिराचे प्रांगण रसिकांच्या गर्दीने फुलून गेले होते. प्राचीन शिवमंदिरात पूजेची लगबग सुरू होती, त्याच वेळी शंभो शंकरा, करुणा करा या भक्तिगीताचे स्वर वातावरणात रुंजी घालू लागले होते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला यांसारखी गीते सादर केलेल्या गीतांना रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाट उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.