
गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई ता. १८ : राज्यभरातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बेमुदत संप सुरू आहे. पेन्शनच्या मागणीसाठी असलेल्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. अशातच आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे संपकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदारांनी संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात मोर्चे काढून निषेध करण्याचा निर्णय सरकारी, निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी घेतला आहे.
सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी ९५ टक्के सरकारी कर्मचारी बाहेरच्या कमाईवर असतात, असे वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षाचा बेमुदत संप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तोल तर ढळलेला नाही ना, असा प्रश्न यावर काटकर यांनी विचारला. आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. उद्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आमदार गायकवाड यांच्याविरोधात मोर्चे काढून निषेध व्यक्त केला जाईल. कर्मचारी, शिक्षक हिताचा तात्काळ निर्णय जर सरकारने घेतला नाही, तर हे आंदोलन चिघळल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा काटकर यांनी दिला आहे.