पाच हजार वाहनांची सिडकोला धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच हजार वाहनांची सिडकोला धडक
पाच हजार वाहनांची सिडकोला धडक

पाच हजार वाहनांची सिडकोला धडक

sakal_logo
By

नवीन पनवेल, ता. १९ (वार्ताहर)ः नैनाविरोधातील गाव बंद साखळी आंदोलनानंतर आता गुरुवारी (ता. २३) पाच हजार वाहनांचा धडक मोर्चा सिडको भवनवर धडकणार आहे. याबाबतची एक बैठक नुकतीच पनवेल येथे पार पडली असून नैना प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत जमीन तर सोडा, पण या मातीचा एक कणदेखील देणार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
नैनाविरोधात सुरू असलेल्या गाव बंद आंदोलनाला गावागावात चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच अनुषंगाने नैनाविरोधी कृती समितीने आता निर्णायक लढा देण्यासाठी कंबर कसली आहे. या आंदोलनाचा पुढचा भाग म्हणून नैनाबाधित शेतकरी, रहिवासी गुरुवारी (ता. २३) दुचाकी, चारचाकी वाहनांसह सिडकोवर धडकणार आहेत. तसेच या माध्यमातून बलाढ्य शक्तीविरोधातील लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या वेळी मोर्चात सहभागी होणाऱ्या प्रत्येक गाडीला काळ्या झेंड्यासह पक्षाचा झेंडा लावायचे आवाहन राजेश केणी यांनी केले आहे. तसेच आता निर्णायक लढाईसाठी सज्ज व्हावे लागेल, आपण नैनाविरुद्ध जनजागृती करतच आहोत, त्यामुळे जनतेला त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव झालेली आहे, पण आता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन प्रकल्पग्रस्तांना करण्यात आले आहे. या वेळी माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काशिनाथ पाटील, नारायण घरत, विलास फडके, शेखर शेलके यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.
-------------------------------
पक्षभेद विसरून सहभागाचे आवाहन
या जमिनी आपल्या पूर्वजांनी राखून ठेवलेल्या आहेत, तिचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे. आपल्या भाकरीवर लाथ मारणाऱ्या नैनाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्थ बसून चालणार नाही, यासाठी आपापसातील हेवेदावे विसरून आणि पक्षीय चपला बाजूला ठेवून नैनाविरोधातील लढा यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------
कोणत्याही परिस्थितीत नैना प्रकल्पासाठी आम्ही आमची जमीन तर सोडा, पण या मातीचा एक कणदेखील देणार नाही. आपल्याला बलाढ्य शक्तीविरुद्ध लढायचे आहे. त्यामुळे आंदोलनात सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे गरजेचे आहे.
- बाळाराम पाटील, माजी आमदार, शेकाप