
२५०० डॉक्टर विशेषज्ज्ञ होण्यापासून वंचित
मुंबई, ता. १९ : राज्यातील २५०० डॉक्टर विशेषज्ज्ञ (सुपर स्पेशालिस्ट) होण्यापासून वंचित राहणार आहेत. कारण या डॉक्टरांना द्याव्या लागणाऱ्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स सुपर स्पेशालिटी (आयएनआयएसएस) परीक्षेनंतरही संबंधित अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासासाठी निश्चित केलेल्या तारखेमुळे विशेषज्ज्ञ होण्यास पात्र होणार नाहीत.
देशातील सर्व सहा आयुर्विज्ञान संस्थांसह १० नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांसाठी दर वर्षी ‘आयएनआयएसएस’ परीक्षा घेतली जाते. दर वर्षी या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील अडीच हजार पदव्युत्तर डॉक्टर बसतात. या अभ्यासक्रमाच्या जुलै सत्रासाठी २९ एप्रिल ही शेवटची तारीख आहे; मात्र ही परीक्षा यंदा २० जून रोजी होणार आहे. त्यामुळे या वेळी डॉक्टर ही परीक्षा देऊ शकतील; पण ते अभ्यासक्रमासाठी पात्र ठरणार नाहीत. त्यामुळे परीक्षेला पात्र होण्यासाठी या डॉक्टरांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या संचालकांना पत्र पाठवून महाविद्यालयात प्रवेशाची तारीख वाढवून देण्याची मागणी केली आहे.
सेंट्रल मार्ड निवासी डॉक्टर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. वेदांग महाजन यांनी सांगितले की, दर वर्षी पदव्युत्तर परीक्षा मे महिन्यात होत होती; परंतु यंदा ही परीक्षा २० जून रोजी होत आहे. कोविडमुळे परीक्षेला उशीर झाल्यामुळे आणि निकालाला विलंब झाल्यामुळे अडीच हजार डॉक्टर सुपर स्पेशालिटी कोर्ससाठी पात्र होणार नाहीत. सुपर स्पेशालिटी कोर्सची परीक्षा दिल्यानंतरही मे महिन्यात सुरू होणाऱ्या कोर्ससाठी पदव्युत्तर परीक्षेचा निकाल देणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी डॉक्टरांचे पत्र मिळाल्याचे सांगितले. तसेच त्यांची मागणी सोडवण्यासाठी पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
----
विविध आजारांसाठी अभ्यासक्रम
लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या कर्करोगापासून ते न्यूरोसर्जन, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोलॉजी आदी विविध आजारांवर विशेष अभ्यासक्रम आणि त्यासंबंधीच्या शस्त्रक्रियांसाठी हा अभ्यासक्रम असतो. ऑल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एम्स) सहा शाखांसह पीजीआय (चंडिगड), जेआयपीएमईआर (पॉन्डिचेरी), निम्हान्स (बंगलोर) आदी प्रसिद्ध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम चालवले जाते.