
अंमली पदार्थाच्या साठ्यासह महिलेला अटक
मानखुर्द, ता. २२ (बातमीदार) ः मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमधून सोमवारी (ता. २०) समसुन्नीसा ऊर्फ लंबी (वय ५२) या महिलेला नायट्राझेफाम या अमली पदार्थासह पोलिसांनी अटक केली. तिच्याकडील अमली पदार्थाच्या ४०५ गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. तिच्याविरोधात अमली पदार्थ आणि मनावर परिणाम करणारे पदार्थ कायदा १९८५ म्हणजेच एनडीपीएस कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हे नोंदवण्यात आले. तिच्याविरोधात यापूर्वी ८ गुन्ह्यांची नोंद आहे.
मानखुर्द पोलिस ठाण्याचे पथक शनिवारी (ता. १८) मंडाळा परिसरातील इंदिरानगरच्या सह्याद्री जलेली चाळ येथे गस्त घालत होते. त्यावेळी समसुन्नीसा त्या ठिकाणी बटन या सांकेतिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या नायट्राझेफाम या अमली पदार्थ म्हणून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांची विक्री करत असल्याचे आढळले. त्या वेळी ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता तिच्याकडे २७ पाकिटांमध्ये एकूण ४०५ गोळ्या सापडल्या. तिच्याविरोधात गुन्हा नोंदवत सोमवारी तिला अटक करण्यात आली. याविषयी माहिती घेण्यासाठी तपासाधिकारी उपनिरीक्षक सुशांत साळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. अंमली पदार्थाच्या विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवत असून महिलेला सोमवारी अटक केल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक महादेव कोळी यांनी दिली.